(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी–गणेशवाडी येथे अज्ञात चोरट्याने बंद घरावर डल्ला मारून रोख रक्कम व सोन्या–चांदीचे दागिने असा सुमारे १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घरफोडी मंगळवार, दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र झराजी निंबरे (वय ४६, रा. कळझोंडी–गणेशवाडी, ता. रत्नागिरी) यांनी याबाबत जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी निंबरे कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील दरवाजाची आतील कडी कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला.
घरात शिरल्यानंतर चोरट्याने कपाटातील सोन्याची माळ, पुतळी, अंगठी, चांदीची सर तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सायंकाळी चारच्या सुमारास कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले. पाहणी केल्यानंतर सोन्या–चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून, इतर विविध अंगांनीही अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

