(रत्नागिरी)
रत्नागिरीचे बांधकाम व्यावसायिक राहुल भोसले यांनी दुबाईत झालेल्या ओशनमॅन वर्ल्ड चॅंपियनशिपमध्ये भारत व रत्नागिरीचे यशस्वी प्रतिनिधित्व करत १० किमी ओपन वॉटर स्विमिंग पूर्ण करून ओशनमॅन किताब पटकावला.
श्री. भोसले यांनी सांगितले की, लहानपणापासूनची पोहण्याची आवड, गावातील विहिरीपासून सुरू झालेला प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला. यापूर्वी ३ किमी व ५ किमी समुद्री स्पर्धा पूर्ण केल्यानंतर काही काळ फिटनेसपासून दूर गेले होते. मात्र दरम्यान मला निश्चय: चे डॉ. नितिन सनगर भेटले आणि पुन्हा फिटनेस प्रवास सुरू झाला, फिटनेस प्रवासात मला अभिजीत पड्याळ सारखा प्रोत्साहन देणारा मित्र भेटला, स्विमिंग कोच विवेक विलणकर, कोकण कोस्टल टीम भेटली, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे मेंबर भेटले. त्यामुळे मी मॅरेथॉन, ट्रायथलॉन अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागलो. यांच्या प्रेरणेने पुन्हा फिटनेस प्रवास सुरू झाला.
एक दिवस चर्चा करताना डॉ. नितिन यांनी ओशनमॅन या स्पर्धेबद्दल कल्पना दिली आणि विचार कर, असा सल्ला दिला. मी लगेच रजिस्ट्रेशन केले. आता मनाशी ठरवलं आणि प्रॅक्टिस करायला सुरवात केली. या साठी निश्चय:च्या डॉ. नितिन यांच्यासोबत मोलाचे मार्गदर्शन झाले ते स्विमिंग कोच विवेक विलणकर यांचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ओपन वॉटर स्विमिंगची प्रॅक्टिस सुरू झाली. पहिला इव्हेंट मी गोवा इथे रजिस्टर केला होता. पण काही कारणास्तव तो इव्हेंट ऑर्गनायझरकडून पूर्ण होऊ शकला नाही. मी थोडा निराश झालो, मनात खंत होती आपला इव्हेंट पूर्ण होऊ शकला नाही. पण थोड्या दिवसात कळाल की गोवा एथिल इव्हेंट दुबई येथे होणार आहे. जायचं ठरवून प्रॅक्टिस सुरू केली. दुबई येथे बुरुज अल अरब येथील काईट बीचवर ही स्पर्धा आयोजित केली गेली होती. जगभरातून ६० पेक्षा अधिक देशांतून स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले.
ओपन वॉटर स्विमिंग/ म्हणजेच समुद्री जलतरण या प्रकारामध्ये जगभरातील प्रतिष्ठीत मानली जाणारी स्पर्धा म्हणजे ओशन मॅन. सातासमुद्रापार जाऊन अरेबियन समुद्रामध्ये पोहण्याचा माझा पहिलाच अनुभव. इतर स्पर्धक दोन दिवस आधी त्या समुद्रमध्ये प्रॅक्टिस करत होते. पण मी उशिरा निघाल्यामुळे मला प्रॅक्टिस करणे शक्य झालं नाही. त्यामुळे मनावर थोडं दडपण होतं. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत आणि पोहायला सुरवात केली. स्पर्धेमध्ये सतत उसळणाऱ्या लाटा अणि समुद्रातील अनिश्चित प्रवाह यामुळे यावर्षीची स्पर्धा आव्हानात्मक ठरली. १० किमी समुद्रात पोहोताना प्रत्येक लाट एक आव्हान होती आणि प्रत्येक श्वास आत्मविश्वास देणारा होता.
अशा परिस्थितीत १० किमीचा पल्ला निर्धारित वेळेत पूर्ण करत, ओशनमॅन किताब पटकाविला. स्वप्न पूर्ण झालं होतं. त्याचा आनंद तर होताच पण थोडा भावुक झालो. कुटुंबासोबत बोललो त्यांना पहिल्यांदा स्पर्धा पूर्ण केल्याची बातमी दिली. कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं. माझी पत्नी, मुल, आईवडील यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. आपल्या रत्नागिरीतून हा किताब मिळवणारा मी पहिला आहे. या विचाराने मित्रपरिवार सुद्धा फोन वरून कौतुक करत होते. हा विजय फक्त माझा नाही, तो माझ्या कुटुंबाचा, मार्गदर्शकांचा आणि रत्नागिरीचा आहे. कोणतीही स्पर्धा फक्त निमित्त असते, तुमच्यामधील क्षमतेची ओळख करून देणारे साधन आहे, शरीर निरोगी ठेवा, आव्हाने स्वीकारा आणि स्वतःला सिद्ध करा, असा संदेशही राहुल भोसले यांनी दिली.

