(रत्नागिरी /प्रतिनिधी)
नागपूर–रत्नागिरी महामार्गावरील रत्नागिरी शहरातील जे.के. फाईल परिसरातील रस्ता सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीच्या बेफिकीर कारभारामुळे या मार्गाची दुर्दशा झाली असून, सर्वत्र खड्डेच खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. काम सुसाट सुरू असल्याचे दाखवले जात असले तरी दर्जाहीन काम व रेंगाळलेली गती यामुळे या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रचंड खड्डे आणि उखडलेला रस्ता यामुळे या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांच्या जीवाशी खेळ ठरत आहे. काही भागातील मार्गिका पूर्ण करण्यात आल्या असल्या तरी उर्वरित काम रेंगाळत पडले आहे. सर्विस रोडची स्थिती तर अधिकच भयावह आहे. मोठमोठे खड्डे, विखुरलेली बारीक खडी आणि असमतोल पृष्ठभागामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
एखादी पावसाची सर आल्यानंतर या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होते. खड्डेमय रस्त्यावर पाण्याचे झरे वाहू लागतात आणि त्यात रस्ता नेमका कुठे आहे हेही वाहनचालकांना दिसेनासे होते. पाण्याखाली दबलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडण्याचा धोका कायम असतो, तर चारचाकी वाहनांना हळूहळू रांगतच मार्ग काढावा लागतो. या त्रासातून जाताना वाहनचालक अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहत रस्ता पार करतात. प्रवासाचा वेळ वाढतो, वाहनांची दुरवस्था होते आणि नागरिकांची मानसिक व शारीरिक कसरत सुरूच राहते. प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे हा त्रास दिवसेंदिवस वाढत असून, याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महामार्ग विकासाचे काम हाती घेऊनही कंपनीकडून दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. काम कितीही वेगाने केले तरी ते दर्जाहीन असेल, तर त्याचा उपयोग काय? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. नागरिक व वाहनचालकांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींनंतरही महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी मूकदर्शकाची भूमिका घेत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वारंवार अपघातांची शक्यता वाढत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रोजचा प्रवास जीव मुठीत धरून करावा लागतोय…
ऐन पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे वाहनचालकांसाठी अक्षरशः जीवघेणे ठरत आहेत. दिवसरात्र खड्ड्यांतून मार्ग काढताना अपघातांची शक्यता वाढली आहे. दुचाकीस्वारांना संतुलन राखणे अवघड होत असून चारचाकी वाहनांची मोर्चेबांधणीसारखी स्थिती झाली आहे. रस्त्यांवरील या दुर्दशेमुळे नागरिकांचा रोजचा प्रवास हा जीव मुठीत धरून करण्याची वेळ आली आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज
अशा परिस्थितीत संबंधित विभाग वारंवारच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो, हे नागरिकांसाठी अधिक त्रासदायक ठरते. काम सुरू असल्याचे सांगितले जाते; मात्र दर्जाहीन काम आणि ढिसाळ नियोजनामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. या गंभीर समस्येकडे आता पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी जबाबदारांवर कठोर कारवाई होणे आणि कामाच्या गतीसोबत गुणवत्तेला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

