(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि पदपथांवरील वाढत्या अतिक्रमणाविरोधात नगरपरिषद प्रशासनाने अखेर कडक कारवाईला सुरुवात केली आहे. पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतील निर्णयाची अंमलबजावणी करत आज (सोमवार) पासून शहरात व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. साळवी स्टॉप परिसरातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहरातील मुख्य रस्ते आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथांवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या टपऱ्या, खोकी, हातगाड्या तसेच वाहतुकीला आणि नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा ठरणाऱ्या अन्य अतिक्रमणांवर पालिका पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर जप्तीची कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
साळवी स्टॉप हा शहराचा प्रमुख प्रवेशमार्ग असल्याने या परिसरातूनच अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. कारवाईदरम्यान संभाव्य विरोध किंवा वादाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शहरातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, तसेच नागरिकांना पदपथांचा मोकळेपणाने वापर करता यावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. साळवी स्टॉपनंतर शहरातील इतर प्रमुख भागांमध्येही अतिक्रमण हटावाची कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.
पालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविले जाण्याची शक्यता असून, नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार कारवाई सुरू ठेवण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

