( नाशिक )
शहरातील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवरील लैंगिक व मानसिक छळ, विनयभंग आणि धर्मांतराच्या प्रयत्नांच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ पावले उचलत अंतर्गत चौकशी सुरू केली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत 8 संशयित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून सखोल तपास सुरू केला आहे आणि काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कंपनीने अधिकृत निवेदन जारी करत स्पष्ट केलं की, कार्यस्थळी कोणत्याही प्रकारच्या छळाविरुद्ध शून्य सहनशीलता धोरण राबवले जाते. घटनेची माहिती मिळताच अंतर्गत चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केलं जात आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला आणि सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य दिलं असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, सरकारी वकील अनिकेत आव्हाड यांनी न्यायालयात मांडणी करताना या प्रकरणातील आरोप गंभीर असल्याचं सांगितलं. पीडित महिला विवाहित असून आरोपी त्याच कंपनीतील कर्मचारी असल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांचा लैंगिक आणि मानसिक छळ करण्यात आला असून कंपनीतील POSH समिती असूनही तक्रारींची दखल घेण्यात आली नाही, असा आरोपही त्यांनी केला. काही संबंधितांनी आरोपींची पाठराखण केल्याचा संशय व्यक्त करत आर्थिक व्यवहार आणि कॉल रेकॉर्ड्सची सखोल चौकशी आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. या पार्श्वभूमीवर HR अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती.
याउलट, आरोपी HR अधिकारी अश्विनी चैनानी यांच्या बाजूने वकील एस आर देशपांडे यांनी बचाव करत सांगितलं की, तक्रार केवळ तोंडी स्वरूपात प्राप्त झाली होती आणि ती वरिष्ठांकडे पुढे पाठवण्यात आली होती. त्यांनी पोलिसांना आवश्यक ती सर्व माहिती, ईमेल आणि मोबाईल दिले असून तपासासाठी काहीही बाकी नाही, असा दावा करण्यात आला. कामाच्या निमित्ताने कॉल होणं स्वाभाविक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने HR अधिकारी अश्विनी चैनानी यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून POSH समित्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

