(राजापूर / तुषार पाचलकर)
रत्नागिरी पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करण्याचा स्तुत्य उपक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राजापूर पोलीस स्टेशन व रायपाटण पोलीस दूरक्षेत्र हद्दीतही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, त्यामुळे जेष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून मंगळवारी पाचल गावचे जेष्ठ नागरिक तसेच पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष श्री. राजन लब्दे यांचा वाढदिवस रायपाटण पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस कॉन्स्टेबल रामदास पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन साजरा करण्यात आला. यावेळी पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. आण्णा पठारे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. लब्दे यांचे स्वागत केले.
कार्यक्रमास पाचल ग्रामपंचायत सदस्य, पाचल प्रशालेचे शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष श्री. विनायक सक्रे, पाचल गावचे पोलीस पाटील श्री. महेंद्र जाधव, युवा कार्यकर्ते श्री. विहंग खानविलकर तसेच ग्रामस्थ श्री. रवी नारकर, श्री. प्रकाश धावडे आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे जेष्ठ नागरिकांना सामाजिक सन्मान मिळत असून, पोलिस व नागरिकांमधील नातेसंबंध अधिक दृढ होत आहेत.

