(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवार दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी १० वा इ. दहावीसाठीआणि दु. १ वा.इ. बारावी कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी घडताना बिघडताना हा विशेष उद्बोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मालगुंड गावचे शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, आचार्य कुल पुरस्कार विजेते, बळीराम परकर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कै. सदानंद बळीराम परकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री.बिपीन सदानंद परकर आणि परकर कुटुंबीयांनी विद्यार्थी व पालकांसाठी एक अनुकरणीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आपले भविष्य उज्वल व्हावे, असे मुलांना मनोमन वाटत असते. आपल्या पाल्यांचे जीवन सुखी आणि समृद्ध व्हावे, यासाठी प्रत्येक पालक धडपडत असतो.पण अनिश्चितता ,तीव्र स्पर्धा, प्रलोभने ढासळलेली मूल्ये, जागतिकीकरण इत्यादींमुळे काही अनिष्ट गोष्टी प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपल्या आहेत, हे दुर्लंक्षून चालणार नाही. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच इतर कोणकोणती जीवन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे, याविषयी या कार्यक्रमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बिपीन परकर कुटुंबीय मालगुंड व जाकादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी केले आहे. हा कार्यक्रम मालगुंड शिक्षण संस्थेच्या अनौपचारिक समितीतर्फे राबवण्यात येत असल्याचे शिक्षण संस्थेचे सचिव विनायक राऊत यांनी सांगितले. या कार्यक्रमाला संजय विद्या विष्णू गोविलकर यांची प्रभावी संकल्पना लाभली आहे.

