(पुणे)
पुण्याचे ग्रामदैवत असलेले श्री कसबा गणपती मंदिर येत्या 15 डिसेंबरपासून तब्बल 15 दिवस बंद राहणार आहे. मंदिरातील मुख्य श्री गणेश मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेची सुरुवात सोमवारपासून होत असून, मंदिराच्या इतिहासात प्रथमच अशी संवेदनशील प्रक्रिया राबवली जात आहे. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच मंदिराच्या ४५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदिर बंद राहणार असल्याचा दावा त्यांनी केला. या वेळी देवस्थानचे खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार आणि स्वानंद ठकार उपस्थित होते.
विनायक ठकार यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून स्वयंभू मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळत आहे, त्यामुळे भविष्यात मूर्तीला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून तातडीने दुरुस्ती प्रक्रिया हाती घेण्यात येत आहे. या कामासाठी मूर्तीतज्ज्ञ, धार्मिक क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच पुरातत्व विभागाचे अधिकारी यांचे मार्गदर्शन घेतले असून संपूर्ण प्रक्रिया शास्त्रोक्त आणि विधिवत पद्धतीने केली जाईल. ही दुरुस्ती प्रक्रिया साधारण तीन आठवडे चालू शकते; मात्र प्रत्यक्ष कामानुसार हा कालावधी कमी किंवा वाढू शकतो. कामाचा वेग पाहून मंदिर लवकरात लवकर भाविकांसाठी खुले करण्याचा देवस्थान ट्रस्टचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असे ठकार यांनी सांगितले.
श्री कसबा गणपती मंदिराचे पुण्याच्या इतिहासात विशेष स्थान आहे. इसवी सन 1614 च्या सुमारास या मंदिराचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी “जयति गजानन” अशी स्तुती केलेले हेच आराध्यदैवत आजही लाखो गणेशभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या या मंदिराचं पुणेकरांच्या दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर संवर्धनाच्या दृष्टीने केली जाणारी ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक असल्यामुळे मंदिर काही काळासाठी बंद ठेवावे लागणार असून, या काळात भाविकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी “जय मिळवून देणारा” असे ज्याचे वर्णन केले, तेच कसबा गणपती पुणेकरांसह अखंड राज्याचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारे हे आराध्य दैवत असल्याने भाविकांमध्ये या निर्णयाबाबत संमिश्र भावना आहेत; पण मूर्तीच्या सुरक्षेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे. दरम्यान, मंदिर बंद असतानाही बाहेरील गाभाऱ्यातील छोट्या गणपतीची पूजा-अर्चा सुरू राहील. विश्वस्तांनी भाविकांना संयम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मूर्ती दुरुस्तीनंतर पुन्हा भक्तांना दर्शन घेता यावे, हाच ट्रस्टचा मानस आहे.

