( गणपतीपुळे / वैभव पवार )
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत सध्या राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. हे स्मार्ट मीटर बसवायचे असल्यास घरमालकाला सर्व माहिती स्पष्ट करून, विश्वासात घेऊनच बसवावे. घरमालकाची परवानगी न घेता कोणतीही जबरदस्ती करू नये, अशा आशयाचे निवेदन वीज कंपनीच्या खंडाळा येथील सहाय्यक अभियंता साईराज नागवेकर यांच्याकडे नुकतेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे देण्यात आले.
या वेळी उपतालुका प्रमुख प्रकाश जाधव, विभागप्रमुख संतोष हळदणकर, उपविभाग प्रमुख हेमंत किरडवकर व सहदेव वीर, माजी विभागप्रमुख तुषार चव्हाण, कळझोंडी शाखा प्रमुख शांताराम वीर तसेच शिवसेना कार्यकर्ते प्रकाश खेडेकर, अनंत अवेरे, सुधाकर महाकाळ, चंद्रकांत पवार, रमेश सावंत, अमोल भुवड, प्रविण मेस्त्री, वैभव मेस्त्री, शेखर भडसावळे, प्रकाश पिंपळे आदी उपस्थित होते.
निवेदन भेटीप्रसंगी ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि खंडाळा वीज वितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता साईराज नागवेकर यांच्यामध्ये खंडाळा परिसरातील घराघरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. या वेळी ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटरबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आणि ग्राहकांना विश्वासात घेऊन स्मार्ट मीटर देण्याची आग्रही मागणी केली. चर्चेनंतर सहाय्यक अभियंता साईराज नागवेकर यांनी, “आपण योग्य ते नियोजन करून स्मार्ट मीटरबाबत जनजागृती मोहीम राबवू”, असे आश्वासन दिले.