(नाशिक)
13 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नासाठी भाग पाडत, नकार दिल्यास अंगावर अॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून साधूवेशातील बालकदास गुरु भक्तीचरणदास महाराज (अमृतधाम, पंचवटी) याच्याविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
प्रकरणाची माहिती
पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी गेल्या तीन वर्षांपासून आरोपीच्या आश्रमात स्वयंपाक, धुणीभांडी आणि साफसफाईचं काम करत होती. जुलै 2025 पासून आरोपीने तिच्यावर लग्नाचा दबाव आणण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने मुलीचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला. घाबरलेल्या पीडित मुलीनं हा प्रकार आईला सांगितला; मात्र आर्थिक परिस्थिती व परराज्यातील असल्याने कुटुंबाने तक्रार करण्याचे टाळले. यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये मुलीनं काम सोडलं असतानाही आरोपीने रस्त्यात अडवून लग्नास नकार दिल्यास अॅसिड टाकण्याची धमकी दिली. वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून पीडित मुलीनं अखेर आईसह पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
भाविकांनाही त्रास
आरोपी बालकदास हा पंचमुखी हनुमान मंदिराच्या महंत भक्तीचरणदास यांच नाव आणि फोटो वापरत असल्याचे समोर आलं आहे. आश्रम परिसरातील काही नागरिकांनाही त्याच्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याची माहिती आहे. पंचवटी पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा नोंद होताच आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधार्थ विशेष पथक कार्यरत आहे.

