(इचलकरंजी)
भाजप हा देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष असून, अशा पक्षाच्या तालावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाचत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. भाजपच्या तालावर नाचणारे स्वतंत्र नसून ते कैद्यांसारखे असल्याचा आरोपही त्यांनी केला. महानगरपालिका निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, निवडणुकीतील उमेदवारांची पळवापळवी, दबावतंत्र आणि दमदाटी पाहता महाराष्ट्राचा बिहार होतो की काय, अशी चिंता वाटत आहे. निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले जात असून, ते स्वीकारणारेही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळेच भ्रष्टाचार वाढला असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकांमध्ये पैसा घेतला नसता, तर आज रस्त्यांची दयनीय अवस्था झाली नसती. निवडणुकीत पैसे वाटले जातात. ते घेणारेही असल्यामुळेच भ्रष्टाचारही वाढत आहे. संविधानामुळे आपण मानाचे जीवन जगतो असलो तरी मताच्या अधिकाराला आग लावली जात आहे.
शहरातील मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधताना आंबेडकर यांनी सांगितले की, सात-सात दिवस शहरात पाणी येत नाही, नद्या प्रदूषित झाल्या आहेत. या परिस्थितीसाठी केवळ सत्ताधारीच नव्हे, तर आपणही जबाबदार आहोत, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
पाटीलकीशाहीला कंटाळून वेगळा निर्णय
इचलकरंजीतील स्थानिक शिव-शाहू आघाडीत पाटीलकीशाही वाढल्याने कंटाळून आम्ही त्या आघाडीतून बाहेर पडलो आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, वस्त्रनगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी शहराला सहा दिवसांतून एकदाच पाणी मिळते, ही गंभीर बाब आहे. तसेच स्थानिक उद्योगांसाठी आवश्यक असलेले कौशल्यपूर्ण कामगार घडवण्यासाठी अपेक्षित प्रयत्न झाले नसल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
या कार्यक्रमाला सिद्धार्थ कांबळे, संदीप देसाई, सुदर्शन कदम, प्रकाश सुतार, वसंत कोरवी, यशवंत भंडारे, सोमनाथ साळुंखे, जनार्दन गायकवाड, पी. आर. कांबळे, रावसाहेब निर्मळे, संदीप कांबळे, वैशाली कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

