(संगमेश्वर / एजाज पटेल)
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यावर जमा होऊ लागले असून . आपल्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी व पैसे काढण्यासाठी मागील चार-पाच दिवसांपासून लाडक्या बहिणी घरातील कामे बाजूला ठेवून, मजुरी बुडवून बँकेत येत आहेत. परंतु एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात महिला बँकेत येत असल्याने दिवसभर बँकेत तुफान गर्दी आहे, तर बँकेच्या बाहेरही लांबच-लांब रांगा लागत आहेत. महिलांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत असतानाच ग्राहकांचीही सुद्धा हबेलहंडी उडत असून आज मंगळवारीही बँक ऑफ इंडिया संगमेश्वर शाखेत प्रचंड गर्दी झाली होती. यात लाडकी बहिणींची संख्या अधिक होती. या गर्दीत एका लाडकी बहिणीला चक्कर येऊन ती जमिनीवर कोसळली.
राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेमार्फत 21 ते 65 वर्ष वय असलेल्या महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ते पैसे खात्यात जमा होऊ लागले असून पैसे जमा झाले की नाही, जमा झालेले पैसे काढण्यासाठी, तर काहींचे बँक खात्याला आधार लिंक नसल्याने ते लिंक करण्यासाठी, तसेच केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींची संगमेश्वर येथील बँकामध्ये तुफान गर्दी होत आहे.
आज मंगळवारी तर येथील बँक ऑफ इंडिया शाखेत अन्य ग्राहकांसह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची मोठी गर्दी होती. बँकेत शिरायलाही अवघड होते. त्याहून अधिक मोठी रांग बँकेबाहेर होती. तासंतास रांगेत ताटकळत व गर्दीमुळे ग्राहकांची दमछाक झाली होती. अशा गर्दीत लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले की नाही याच्या चौकशीसाठी आलेल्या मुचरी येथील महिलेला रांगेत उभी असताना चक्कर येऊन ती जमिनीवर कोसळली.
यावेळी त्या महिलेच्या गावातील आलेल्या अन्य महिला तसेच संगमेश्वर येथील प्रतिष्टीत व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते निलेश कदम यांनी त्या महिलेला जवळच असलेल्या खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. तसेच त्या महिलेच्या नातेवाईकांना याची कल्पना दिली.

