जालना येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त खळबळजनक घटना घडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या एका व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याने कमरेवर लाथ मारली. ताब्यात घेतल्यानंतर त्या आंदोलकाला घेऊन जात असताना पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी मागून धावत येत त्या आंदोलकाच्या कंबरेत लाथ घातली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलीस उपअधीक्षकांवर टीका होत आहे.
जालना येथील या व्यक्तीच्या पत्नीने परस्पर दुसरे लग्न केले. या प्रकरणात मदतीसाठी त्याने पोलिसांकडे धाव घेतली, मात्र कोणतीही मदत न झाल्याचा त्याचा आरोप आहे. वैफल्यग्रस्त झालेल्या या व्यक्तीने स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी, त्याला पोलिसांनी रोखले आणि त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी (डीएसपी) अनंत कुलकर्णी यांनी आंदोलनकर्त्याच्या कमरेत लाथ मारल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते. ही घटना ध्वजारोहण कार्यक्रमाच्या काही वेळ आधीची आहे.
पोलिसांचे स्पष्टीकरण
या घटनेनंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले की, आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांवरही रॉकेल फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी बळाचा वापर करावा लागला, असे डीएसपी कुलकर्णी यांनी सांगितले. या प्रकरणी गोपाल चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंदोलनाचे कारण
मिळालेल्या माहितीनुसार, अमित चौधरी आणि गोपाल चौधरी हे दोघेही गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. त्यांचा आरोप आहे की, कौटुंबिक वादातून दाखल गुन्ह्यात पोलिस आरोपींना पाठिशी घालत असून फिर्यादींना त्रास देत आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या असताना आंदोलकांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्याचवेळी ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली.

