(मुंबई)
मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर सशक्त, धारदार आणि जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी कै. गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गव्हाणकर फॅन क्लब व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा कोकणाच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव करणारी असून, सात जिल्ह्यांतील कलावंतांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
ही स्पर्धा मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील सातही जिल्ह्यांसाठी खुली असून, या सर्व भागांतील हौशी व व्यावसायिक रंगकर्मी, नवोदित कलाकार, लेखक-दिग्दर्शक यांना सहभागी होता येणार आहे. कोकणच्या मातीत रुजलेल्या लोकभाषा, सामाजिक वास्तव, लोकजीवन, परंपरा व समकालीन प्रश्न यांना एकांकिकेच्या माध्यमातून अभिव्यक्त करण्यासाठी ही स्पर्धा एक प्रभावी संधी उपलब्ध करून देत आहे.
कै. गंगाराम गवाणकर यांनी ‘निवडणूक’, ‘वस्त्रहरण’ यांसारख्या गाजलेल्या नाट्यकृतींमधून मालवणी भाषेची ताकद, तिचा उपरोध, विनोद आणि सामाजिक भान प्रभावीपणे मांडले. त्यांनी केवळ लेखक म्हणूनच नव्हे, तर समाजभान जपणाऱ्या विचारवंत रंगकर्मी म्हणून मराठी रंगभूमीला नवे परिमाण दिले. त्यांच्या हयातीतच त्यांनी मालवणी भाषेला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आणि आज त्यांच्या पश्चातही त्यांचा हा वारसा जिवंत ठेवण्याची जबाबदारी समाजावर आहे.
याच भावनेतून आयोजित करण्यात आलेली ही कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा म्हणजे केवळ स्पर्धा नसून, गंगाराम गव्हाणकरांच्या विचारांना, त्यांच्या साहित्यपरंपरेला आणि मालवणी भाषेच्या सांस्कृतिक सामर्थ्याला दिलेली अर्थपूर्ण आदरांजली आहे. नव्या पिढीतील कलाकारांनी स्थानिक बोली, लोकजीवन आणि सामाजिक प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहावे, त्यातून सशक्त कलाकृती निर्माण व्हाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आजच्या बदलत्या काळात स्थानिक भाषा व सांस्कृतिक मूल्ये जपणे हे मोठे आव्हान बनले आहे. अशा वेळी कोकणातील सात जिल्ह्यांना एकत्र आणणारी ही स्पर्धा सांस्कृतिक ऐक्य, कलात्मक संवाद आणि नवसर्जनाला चालना देणारी ठरेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
या स्पर्धेमुळे गंगाराम गवाणकर यांचे कार्य, त्यांचे अस्तित्व आणि मालवणी भाषेचा ठसा नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, तसेच कोकणातील रंगभूमीला नवी दिशा व ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.
या स्पर्धेचे आयोजन गवाणकर फॅन क्लब, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्यातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची जिल्हावार तारीख, स्पर्धेचे नियम व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
सिंधुदुर्ग जिल्हा – दिनांक ३ जानेवारी २०२६ संपर्क- रमण वायगणकर ९६२३७२७९२०, हेमंत करगुटकर- ९९२३२३५१२७, रत्नागिरी जिल्हा- दिनांक ४ जानेवारी २६, संपर्क- राजीव कीर ९४२२४२९८९८, नंद्र गवाणकर- ९४०५४७९२३६, ९२८४५१६३६६, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्हा दिनांक १० व ११ जानेवारी २६ संपर्क- दशरथ कीर- ७३०४०५३३८७, समीर चव्हाण – ९८२१८१२३३८

