(बंगळुरू)
नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीने केलेला सामूहिक बलात्काराचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि विद्यार्थिनीच्या व्हॉट्सअॅप चॅट्सच्या तपासणीत हा प्रकार तिच्या संमतीने घडल्याचे उघड झाले असून, खोटी तक्रार दाखल केल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
मूळची केरळची असलेली ही विद्यार्थिनी बंगळुरूतील एका खासगी कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. तिने 6 डिसेंबर रोजी मडीवाला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत 2 डिसेंबरच्या रात्री सर एम. विश्वेश्वरैया टर्मिनलजवळ एका टॅक्सी चालकाने व त्याच्या साथीदारांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून प्रकरण अधिकारक्षेत्रानुसार बनसवाडी पोलिसांकडे वर्ग केले.
विद्यार्थिनीच्या जबाबावरून पोलिसांनी 33 वर्षीय टॅक्सी चालकाला पूर्व बंगळुरूमधील त्याच्या घरातून अटक केली. दोन मुलांचा पिता असलेल्या या चालकाने तपासादरम्यान सातत्याने आपण निर्दोष असल्याचा दावा केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर आले.
सीसीटीव्ही फुटेजनुसार 2 डिसेंबर रात्री 11.30 ते 3 डिसेंबर पहाटे 5.30 या वेळेत विद्यार्थिनी आणि टॅक्सी चालक एकत्र फिरताना, गाडीत बसताना व बाहेर उतरताना दिसत आहेत. विद्यार्थिनीने आरोप केलेले त्याचे कथित साथीदार कुठेही फुटेजमध्ये आढळले नाहीत. अखेरीस पहाटे 5.30 वाजता विद्यार्थिनी एर्नाकुलमकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढताना दिसते.
यानंतर पोलिसांनी टॅक्सी चालकाचे व्हॉट्सअॅप चॅट्स तपासले. घटनेनंतरही विद्यार्थिनीने त्याला संदेश पाठवले असल्याचे आढळले. या चॅट्समधून दोघांमधील संबंध परस्पर संमतीने असल्याचे स्पष्ट झाले. पुन्हा चौकशीसाठी बोलावल्यावर विद्यार्थिनीने कबुली दिली की, मानेवरील ओरखडे आणि ‘लव्ह बाईट्स’ प्रियकरापासून लपवण्यासाठी तिने खोटी तक्रार दाखल केली होती.
टॅक्सी चालकानेही पोलिसांना सांगितले की तो विद्यार्थिनीला आधीपासून ओळखत होता, कारण दोघेही केरळचे आहेत. त्या रात्री त्याने तिला केवळ स्टेशनपर्यंत सोडले होते. विद्यार्थिनीने त्यावेळी आपल्या प्रियकराला पहाटेची ट्रेन पकडणार असल्याचे फोनवर सांगितल्याचेही तपासात समोर आले आहे.
या प्रकरणामुळे गंभीर गुन्ह्यांच्या खोट्या तक्रारींचे दुष्परिणाम पुन्हा एकदा समोर आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

