(यवतमाळ)
अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर (वय 52) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. 10 लाख रुपयांच्या वसुली प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात त्यांनी एकूण 3 लाख रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमुळे यवतमाळ पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, ठाणेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया काल रात्रीपर्यंत सुरू होती.
तक्रारदाराने आपल्या मित्राला सहा महिन्यांसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र मुदत संपूनही पैसे परत न मिळाल्याने 10 डिसेंबर रोजी त्यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणात पैसे वसूल करून देण्याच्या बदल्यात पोलीस निरीक्षक रणधीर यांनी 3 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने अमरावती येथील ACB कार्यालयात तक्रार नोंदवली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB ने सापळा रचला. शुक्रवारी झालेल्या पडताळणीत रणधीर यांनी लाच स्वीकारण्यास होकार दिला. दुपारी अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील त्यांच्या दालनात पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये स्वीकारत असताना ACB पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
विशेष बाब म्हणजे, लहान मुलाला कडेवर घेऊन आलेल्या एका महिला अधिकाऱ्याने ही कारवाई यशस्वी केली. काही क्षणांपूर्वीच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने हे रणधीर यांच्या कक्षातून बाहेर पडले होते. बैसाने बाहेर पडताच तक्रारदार आणि ACB पथक ठाण्यात पोहोचले. महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीतच रणधीर यांनी एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. वेशांतर करून आलेल्या पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे यांनी तत्काळ रणधीर यांना ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष कारवाई पूर्ण केल्यानंतर रणधीर यांना यवतमाळ ACB कार्यालयात आणण्यात आले असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अवधूतवाडी पोलीस ठाण्यातच रणधीर यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ACB कडून सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, स्वप्नील निराळे, शैलेश कडू, उपेंद्र थोरात, वैभव जायले, सतीश किटुकले आणि राजेश बहिरट यांच्या पथकाने केली.
दरम्यान, या घटनेमुळे पोलिस वर्तुळात मनोबल खालावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून, भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला नव्याने चालना मिळाल्याचे ACB अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

