(चिपळूण / रत्नागिरी प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटवणाऱ्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावरील जीवघेण्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी उल्लेखनीय वेगाने तपास पूर्ण करत अवघ्या १८ ते १९ दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. सोमवारी (दि. १३ एप्रिल) येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या चार्जशीटमध्ये ‘चिपळूण नागरी पतसंस्था’शी संबंधित १० कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पत्रकार संघटनांनी आक्रमक भूमिका घेत निषेध आंदोलनाचा इशारा दिला होता. विशेषतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी उपोषणाची हाक देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम ४०० लागू करून तपासाला गती दिल्यानंतर पत्रकारांनी जाहीर केलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
तपासादरम्यान फिर्यादी दीपक भागवत यांच्या उपस्थितीत संशयितांची ओळख परेड घेण्यात आली. तसेच भागवत यांच्या पुरवणी जबाबाच्या आधारे प्रशांत यादव आणि पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचेही जबाब नोंदवण्यात आले. प्रशांत यादव यांचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्यात आला असता, घटनेच्या वेळी ते संगमेश्वर येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या थेट सहभागाबाबत सध्या ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, पत्रकारांच्या मागणीनुसार स्वप्ना यादव यांच्याही सीडीआरचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिली.
घटनास्थळावरील शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी जप्त केले असून ते दोषारोपपत्रासोबत न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या फुटेजच्या आधारे घटनाक्रम स्पष्ट करण्यात तपास यंत्रणेला महत्त्वाची मदत मिळाली. तसेच पतसंस्थेतील एका अधिकाऱ्याच्या मदतीने व्हिडिओतील दहा जणांची ओळख पटवण्यात आली. या प्रकरणात संदीप घुले, मंगेश महाडिक, सचिन डेरवणकर, सौरभ सुर्वे, रोहित खांबे, संकेत कदम, अभिषेक मोहिते, चैतन्य कदम, विनोद खेतले आणि प्रशांत पवार या दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून सर्वांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या गुन्ह्यात भारतीय न्याय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) यांसह विविध कलमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ‘महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (संरक्षण) अधिनियम २०१७’ अंतर्गतही कारवाई करण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले आहे.
पत्रकार दीपक भागवत यांची संमिश्र प्रतिक्रिया
दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर स्थानिक पत्रकारांनी तपास अधिकारी प्रकाश बेले यांची भेट घेत तपासाची सविस्तर माहिती जाणून घेतली. अल्पावधीत तपास पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त करत पुढील न्यायप्रक्रियेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेले पत्रकार दीपक भागवत यांनी पोलिस तपासाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तपासातील काही त्रुटींविषयी नाराजी व्यक्त करतानाच न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायालय या त्रुटींची दखल घेऊन न्यायदानाचे आदर्श उदाहरण घालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

