(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे कोतवडे (ता. रत्नागिरी) येथील बौद्धवाडीतील सार्वजनिक विहिरीत सोमवारी (२३ सप्टेंबर) सकाळी बिबट्या पडल्याची घटना घडली. गावातील सरपंच संतोष बारगोडे यांनी सकाळी साडेसात वाजता वनविभागाला ही माहिती दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि अवघ्या पंधरा मिनिटांत बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
या भर वस्तीमध्ये असलेल्या विहिरीची लांबी १० फूट, रुंदी ४ फूट व खोली सुमारे ४० फूट आहे. विहिरीला चिरेबंदी कठडा असून पाण्याची पातळी १०-१२ फूट आहे. या विहिरीत बिबट्या पाण्यातील पायरीवर बसलेला दिसून आला. पिंजरा दोऱ्यांच्या सहाय्याने विहिरीत सोडताच बिबट्या त्यात शिरला आणि सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात यश आले. या नर बिबट्याचे वय सुमारे ९-१० वर्षे असल्याचे पशुवैद्यक अधिकारी अभिजीत कसाळकर यांनी तपासणीनंतर सांगितले. तो पूर्णपणे सुरक्षित असून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला आहे. स्थानिक परिस्थितीनुसार भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
ही संपूर्ण कारवाई विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. परीक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक विराज संसारे, शर्वरी कदम, शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे तसेच स्थानिक पोलीस अधिकारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा थरारक बचाव यशस्वी झाला.
या घटनेत गावकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाले. विहिरीच्या ठिकाणी गावचे सरपंच संतोष बारगोडे, उपसरपंच स्वप्निल पड्याळ, पोलीस पाटील पूर्वा पवार, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, तसेच स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनी मदत केली. वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास त्वरित वनविभागाच्या टोलफ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.

