(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून, मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. अशा तापलेल्या वातावरणात प्रभाग क्रमांक ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या अधिकृत उमेदवार नौसीन काझी यांनी विरोधकांच्या विकासदाव्यांचा पर्दाफाश केला.
प्रभागातील नळपाणी योजनेचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न हा दिशाभूल करणारा असून, प्रत्यक्षात ही योजना निम्न प्रतीची असल्याचे काझी यांनी दाखवून दिले. रस्त्यांच्या विकासाचा दावा करणाऱ्या विरोधकांना प्रभागातील जीर्ण, विवरांनी बाधित रस्त्यांचे फोटो-व्हिडिओ दाखवून त्यांनी ठोस प्रत्युत्तर दिले. सध्या सुरू असलेल्या टेनिस कोर्टाच्या कामालाही त्यांनी प्रश्नचिन्ह लावत, “या प्रकल्पाचा स्थानिक जनतेला काहीच फायदा नाही. येथे व्यापारी संकुल उभारले असते तर स्थानिक युवक–महिलांना रोजगारनिर्मितीची मोठी संधी मिळाली असती,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.
निवडणूक काळात कब्रस्तानाच्या विषयाचे खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्नही अन्यायकारक असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. “या कामासाठी एखाद्या व्यक्तीचे नव्हे, तर अनेकांच्या प्रयत्नांचे योगदान आहे,” असेही त्यांनी नमूद केले. तसेच अद्ययावत जिम उभारल्याचा दावा करणाऱ्यांना “ती जिम आहे तरी कुठे? तिचा लाभ स्थानिक युवक घेतात तरी कसा? असा सरळ प्रश्न त्यांनी केला. प्रभाग क्रमांक ४ मध्ये विकासाची गंगा वाहण्यासाठी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडून भरघोस निधी आणण्याचा विश्वास नौसीन काझी यांनी व्यक्त केला.

