(रत्नागिरी)
वेळ सकाळी सात साडेसात..स्थळ पोमेंडीची देवराई..पक्षांचा सुरेल आवाजाने स्वागत..पक्षी निरीक्षकांचे डोळे, दुर्बिणी, मोबाईल आणि कॅमेराच्या गन क्षणार्धात झाडांच्या शेंड्यांवर सुरांकडे स्थिरावल्या. काळ टोपी हळद्या, निलकर्ण खंड्या, तपकिरी डोक्याचा तांबट आणि वन घुबडाच्या जोडीच्या दर्शनाने पक्षी निरीक्षक सुखावून गेले.
वन विभाग आयोजित पक्षी मित्र संमेलन 2026 ची सांगता थेट क्षेत्रीय स्तरावरील भेटीने आणि पक्षी निरीक्षणाने आज झाली. सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतिक मोरे, पक्षी मित्र विराज आठल्ये, निकिता शिंदे यांच्यासह राज्यभरातून आलेले पक्षी मित्र, पक्षी निरीक्षक आज एकत्रितपणे पक्षी निरिक्षण, जंगल वाचनाचा आनंद घेत होते. सकाळी सात साडेसात वाजता पोमेंडी येथील देवराईत सर्वजण पोहचले. या सर्वांचे स्वागतच पक्षांच्या सुरेल आवाजाने जणू झाले. काजरा या वृक्षाची माहिती श्री. मोरे यांनी सर्वांना दिली. समोरच मलबार पाईड हॉर्न बिलने आपली झलक दाखवून पक्षी निरीक्षणाची दमदार सुरुवात केली.

एशियन ब्लॅक ड्रोंगो अर्थात कोतवाल झाडावर आपल्या अस्तित्वाचे साम्राज्य पसरवू पहात होता. चिरक्या आवाजात राग व्यक्त करत, अन्य पक्षांना झाडावरुन हाकलू पहात होता. त्याला न जुमानता ब्लॅक हेडेड बार्बेट अर्थात तपकिरी डोक्याचा तांबट दोन्ही दिशांना मान हलवत ‘कुटुर, कुटुर..’ आपल्या जोडीदाराला साद घालत होता. शिळकरी कस्तुराची जणू अस्तित्व दाखविल्या सारखी इंडियन आयोरा अर्थात सुभग शिळ घालत होता. फुलटोच्या, फूलचुक्या, सूर्य पक्षी, एशियन कोयल अर्थात मादी कोकीळ, पानांच्या हालचालीत ‘आम्हीही आहोत म्हटलं..’ हे सांगून राहिली होती.
काळ टोप्या हळद्याचा सूर परिसरात घुमत होता. त्याच्या सुरात सूर मिसळत बहुधा त्याची जोडीदारीण त्याला आपलं हृदय बहाल करत असावी. पुढे वहाळाच्या खबदाडीत पुलाच्या खालच्या बाजूला झाडाला यु आकारात कवटाळलेल्या वेलीच्या चौकटीत जंगल वुड आऊल अर्थात वन घुबडाने प्रथम दर्शन दिले. ती त्या वन लाकडात, परिसरात रंगाने मिसळून गेली होती. पण, सर्वांवर नजर ठेवून बसली होती. थोड्या वेळातच तिचा जोडीदार तिच्याजवळ आला, ते प्रेमी युगलांप्रमाणे आपल्यातच रममाण झालेले होते. तरीही सर्वांवर त्यांची नजर होतीच. बराच वेळ प्रणयाराधना सुरु होती. त्यानंतर एकजण तेथून उडाला. तर दुसरी अद्यापही बसून होती.
पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यामध्ये अचानक ब्लू इअर्ड किंगफिशर अर्थात निलकर्ण खंड्या डुबकी मारुन गेला. सगळ्यांच्या नजरा, दुर्बिण, मोबाईल आणि कॅमेरे त्याला टिपण्यासाठी सरसावले. पुन्हा तो आला हलकीशी सूर मारुन गेला. त्याचा तो निळा रंग चमकून गेला. पुन्हा तो सर्वांच्या समोर एखाद्या मॉडेलप्रमाणे आला. आता मात्र तो बराच वेळ ऐटबाजपणे वाहत्या पाण्यातील फांदीवर बसून होता. एकाचवेळी मान आणि शेपूट उडविण्याची त्याची लकब नजरेतून आणि कॅमेऱ्यातून सुटली नाही. कॅटवॉक करणाऱ्या मॉडेलने आपली पोज द्यावी, असे ते भासत होते.
वर झाडावर जंगल बदाम चे लालसर फळ फुटून काळ्या बिया खाली सांडलेल्या होत्या. पुढे झाडाच्या छोट्या फांदीवर घरटे लटकत होते. तो फ्लॉवर पेकर अर्थात फुलटोच्या होता. ब्लॅक नेपेड मोनार्च अर्थात जांभळी लिटकुरी तिचे अस्तित्वही जाणवून गेले.
परतीच्या मार्गावर दयाळाची, बुलबुलची, सुभगची शीळ कानी पडली. सूर्यपक्षांचं चुकचूकणं अधून-मधून सुरुच होतं. हळद्या जणू त्याच्या आवाजाने, उडाणाने आम्हाला जणू आमची पाठवणी करत असावा. आजच्या या पक्षी दर्शनाने पक्षी मित्र संमेलनाला आलेले राज्याच्या विविध भागातून आलेले पक्षी मित्र, पक्षी निरीक्षक अगदी मनापासून सुखावून गेले.

