(नागपूर)
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक बदली प्रक्रियेत महिला शिक्षकांना प्राधान्य देण्याबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. विशेषतः ज्या शाळांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे, त्या शाळांमध्ये महिला शिक्षकांची नियुक्ती केली जावी, यासाठी लवकरच ग्रामविकास विभागासोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदस्य अरुण लाड यांनी या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी सदस्य चित्रा वाघ, जयंत आसगावकर, ज. मो. अभ्यंकर आणि विक्रम काळे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
भोयर यांनी सांगितले की, सध्या लागू असलेल्या बदली धोरणात महिलांसाठी स्वतंत्र प्राधान्य नसून दुर्धर आजार, पती-पत्नी एकत्रीकरण आणि उमेदवारांची पसंती असे निकष वापरले जातात. मात्र बदलत्या परिस्थितीत मुलींच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या शैक्षणिक वातावरणासाठी महिला शिक्षकांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव सकारात्मकपणे विचारात घेतला जात आहे.
मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये पोक्सो समित्या, युवा गट, तक्रार निवारण प्रणाली आणि विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या शाळांमध्ये महिला समुपदेशक किंवा महिला शिक्षकांचा अभाव आहे, तिथे संबंधित विभागाशी चर्चा करून महिला समुपदेशकांची नियुक्ती करण्यावर भर देण्यात येणार आहे.
यासोबतच, 2008 नंतर 100 टक्के अनुदानात सामावलेल्या शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत वित्त विभागाशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 2008 पूर्वीच्या शाळांना मिळणारे वेतनेतर अनुदान वेळेवर देण्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात येतील.
राज्यात समग्र शिक्षा अभियान, पीएमश्री शाळा आणि सीएमश्री शाळा उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात शाळांची बांधकामे सुरू असल्याची आणि जिल्हा नियोजन समितीद्वारेही मोठा निधी उपलब्ध होत असल्याची माहितीही राज्यमंत्री भोयर यांनी यावेळी दिली.

