(मुंबई)
‘मायानगरी’ मुंबईच्या चविष्ट स्ट्रीट फूडने जगाला भुरळ पाडत पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जगभरातील खाद्यपदार्थांचे मानांकन करणारी प्रतिष्ठित संस्था ‘टेस्ट ॲटलस’ने सन 2025-26 ची ‘जगातील 100 सर्वोत्तम फूड सिटीज’ची यादी जाहीर केली असून, मुंबईने सलग दुसऱ्या वर्षी जगात 5 वे स्थान मिळवले आहे.
दिल्ली, लखनऊ, हैदराबादसारख्या दिग्गज खाद्य शहरांना मागे टाकत, मुंबईतील वडापाव, पावभाजी, भेळपुरी यांसारख्या देसी चवींच्या पदार्थांनी जागतिक मान्यता मिळवली आहे. मुंबई केवळ बॉलिवूड किंवा आर्थिक राजधानी नाही, तर उत्कृष्ट स्ट्रीट फूडसाठीही जागतिक स्थरावर प्रसिद्ध शहर बनले आहे.
जागतिक सर्वेक्षणाची माहिती
या मानांकनासाठी जगभरातील 16,000 हून अधिक पदार्थांवर 5.9 लाख लोकांचे रेटिंग विचारात घेतले गेले. या सर्वेक्षणातून मुंबईतील गल्ली-बोळातील चटपटीत आणि कुरकुरीत ‘देसी स्वाद’ जागतिक स्तरावर प्रख्यात ठरला आहे.
‘टॉप 100 फूड सिटीज’मध्ये भारताची छाप
मुंबईसह भारताची एकूण 6 शहरे यादीत समाविष्ट आहेत:
- मुंबई: 5 वे स्थान
- अमृतसर: 48 वे स्थान
- नवी दिल्ली: 53 वे स्थान
- हैदराबाद: 54 वे स्थान
- कोलकाता: 73 वे स्थान
- चेन्नई: 93 वे स्थान
‘टॉप 100’ डिशेसमधून भारताचे स्वाद जगभर
‘टेस्ट ॲटलस’ने जगातील 100 सर्वोत्तम व्यंजनांची यादीही प्रसिद्ध केली, ज्यात भारतीय पदार्थांचा तडका चमकला आहे:
- अमृतसरी कुलचा: 17 वे स्थान – तूप आणि मसाल्यांनी परिपूर्ण, कुरकुरीत आणि चटपटीत
- मुरग मखनी (बटर चिकन): 66 वे स्थान – जाड, मलईदार ग्रेव्ही
- हैदराबादी बिर्याणी: 72 वे स्थान – दमदार शिजवलेली खास बिर्याणी
- शाही पनीर: 85 वे स्थान – भारतीय मसाल्यांचा आणि पनीरचा शाही संगम
भारतीय प्रादेशिक खाद्यसंस्कृतीची ओळख
भारताच्या प्रादेशिक खाद्यसंस्कृतीनेही जागतिक स्तरावर आपली छाप पाडली:
- दक्षिण भारत: 40 वे स्थान (मसाला डोसा, हैदराबादी बिर्याणी, नेथिली फ्राय)
- पश्चिम बंगाल: 73 वे स्थान
- महाराष्ट्र: 76 वे स्थान
- केरळ: 97 वे स्थान
एकूण ‘भारतीय खाद्यसंस्कृती’च्या मानांकनात भारताने 13 वे स्थान मिळवले आहे. मागील वर्षीच्या 12 व्या स्थानापासून किंचित घसरण झाली असली तरी, भारताने पेरू, पोर्तुगाल आणि स्पेनसारख्या देशांना मागे टाकले आहे. ‘टेस्ट ॲटलस’ने बटर गार्लिक नान, अमृतसरी कुलचा, तंदूरी चिकन आणि कोरमा हे भारतीय पदार्थ “नक्की चाखावे” असे नमूद केले आहे.

