(नागपूर)
राज्याच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याचा आणि वाढवण बंदराच्या विकासाचा विचार करता, 2036 पर्यंत देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विधानभवनातील मंत्रीपरिषद सभागृहात 11 डिसेंबर रोजी झालेल्या बंदरे विकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रस्तावित शिपयार्डसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून जागेची निश्चिती करण्याचा आदेश दिला. तसेच जयगड, आंग्रे, रेडी आणि विजयवाडा या बंदरांच्या विकासासाठी वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्ग तातडीने तयार करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. या रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासन आर्थिक सहभागाची तरतूद करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाढवण बंदर ते नाशिकदरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महामार्ग उभारत आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रभावित क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
बंदर परिसरात उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व बंदरे विभाग यांच्या समन्वयातून नवीन कंपनी स्थापन करण्याचेही निर्देश देण्यात आले. वाढवण बंदरासह आसपासच्या मोठ्या बंदरांच्या विकासासाठी विशेष नियोजन प्राधिकरण निर्माण करण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला गती
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी बोटी संपूर्णपणे इलेक्ट्रिक असाव्यात, सुरुवातीला हायब्रिड मॉडेलचा वापर करावा, तसेच नवीन बोटी खरेदी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. “कोचीपेक्षा मोठा आणि अत्याधुनिक मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास न्यावा,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
सध्या महाराष्ट्रात 36 प्रवासी मार्गांद्वारे वर्षाला 1.80 कोटी प्रवासी जलमार्गांचा वापर करतात. मुंबई महानगर प्रदेशात यापैकी 21 मार्ग असून त्यावरून 1.6 कोटी प्रवासी प्रवास करतात. प्रस्तावित मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पांतर्गत 21 टर्मिनल्स आणि 200 नॉटिकल माईलच्या मार्गांची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा DPR तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती अप्पर मुख्य सचिव संजय सेठी यांनी बैठकीत दिली.

