(पोलादपूर /शैलेश पालकर)
संविधान उखडायचे आहे असा प्रतिगाम्यांचा विचार स्पष्ट झाल्यानंतर आता संविधानासोबत जनतेला आणायचा प्रयत्न आहे. भीमरावांच्या चवदार तळे ते शिवरायांच्या रायगडपर्यतच्या समता मार्ग करीत आहोत. 2027 ला समतेचा संगरला 100 वर्षे पूर्ण होतील म्हणून 27 नोव्हेंबरला संविधान दिन वेगळा साजरा केला पाहिजे. पण त्याआधी महाड ते शिवराजधानी रायगड समता मार्गावर येत्या 26 नोव्हेंबरला संत-स्वराज्य-संविधानयात्रेचे आयोजन करून छ.शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी 10 हजारांहून अधिक सर्वधर्मियांसोबत सर्वपक्षियांची उपस्थिती अपेक्षित असल्याने हा सोहळा आतापर्यंतचा सर्वात मोठा संविधान रक्षणाचा सोहळा असेल, अशी माहिती सर्वहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्काताई महाजन यांनी महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आयोजित विचारविनिमय बैठकीेप्रसंगी दिली.
याप्रसंगी भारत घोगरे गुरूजी, काँम्रेड धनाजी गुरव, भारत तथा कैकाडी महाराज जाधव, ह.भ.प. फडतरे महाराज, जालिंदर धिंगे, कैलास देसाई तसेच सर्वहारा जनआंदोलनाचे चंद्रकांत गायकवाड आणि सोपान सुतार यांच्यासह अन्य समाजसेवी व्यक्ती तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रारंभी उल्काताई महाजन यांनी जी.जी. पारिख यांना श्रध्दांजली वाहताना युसूफ मेहेरअली सेंटर तारा पेण आणि पनवेलच्या मध्ये उभारणी करून सामाजिक प्रयोग केल्याचे सांगून गेल्यावर्षी 100 वर्षं पूर्ण केली आणि 101 व्या वर्षी निरोप घेतला, असे सांगितले. राज्यस्तरीय संयोजन समितीमार्फत आर्किओलोजी व अन्य डिपार्टमेंटच्या परवानग्या आवश्यक आहेत.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची भेट झाली सकारात्मक प्रतिसाद आहे. पण संत-स्वराज्य-संविधानयात्रेचे आयोजन जनचळवळीच्या जोरावर चालणार, असेही उल्काताई महाजन यांनी स्पष्ट केले.
शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवस्वराज्य मोहिमेची माहिती देताना कैलास देसाई यांनी 26 नोव्हेंबरला विविध सामाजिक व धार्मिक संस्कृतींची छ.शिवाजी महाराजांना सामूहिक मानवंदना करण्याचा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर 27 नोव्हेंबरला रायगड प्रदक्षिणेचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी काँम्रेड धनाजी गुरव यांनी, महाराष्ट्रभरातून 10 हजाराहून अधिक कार्यकर्ते रायगडावर येणार असून आपण विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्षपद भूषविताना मंदिरातून बडवेहटाव आंदोलन केल्याची माहिती देऊन सामाजिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होत नाही. जे तरुण प्रतिगाम्यांसोबत शिवाजी महाराजांच्या नावाने जात आहेत त्यांना सोबत घेऊन वादाचे मुद्दे खोडावेत, असे प्रयत्न करण्याची गरज आहे. भारतीय संविधान आणि शिवाजी महाराज यांच्या एकत्वाचे विचार रायगडावरून देशाला कळविण्याची गरज आहे. ट्रेकींग व गडकोट मोहीमेतील तरुणांना सोबत घेऊन त्यांना प्रभावित करण्यासाठी येत्या 26 नोव्हेंबरला रायगडावरून यल्गार करण्याची गरज आहे. तरुण मुले शिवाजी महाराजांच्या नावाने एकवटतात. संभाजी महाराज बलिदान मास मध्ये तरुणांना बहकवले जात आहे. यात बदल करण्याची गरज आहे. असे मत मांडले.
याप्रसंगी भरतमहाराज कैकाडी जाधव यांनी, रायगडच्या पायऱ्या चढून चुकीच्या विचारांची विषपेरणी तरुणांच्या मनात केली गेली. या भूमीतून वारकरी संप्रदाय व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यविषयक विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा विचार या भुमीतून मांडला. आरक्षण विचार एकमेकांना विरोध करीत आहे. रायगडावरून देशाला संदेश द्यायचा आहे की आम्ही एक आहोत, देश-धर्मभेद्यांना थारा देणारे नाही, हे कळवायचे आहे. आम्हाला स्वराज्य हवे आहे. अठरापगड जाती आणि रयत म्हणून रायगडावर जायचे आहे. छत्रपती आणि संविधानाला मानवंदना द्यायची आहे. प्रत्येकानी घरातून शिदोऱ्या आणून संतांना आणि छत्रपतींना अपेक्षित समतेचा काला करायचा आहे. संघटित होऊन संघर्ष करीत नाही; तोपर्यंत महाराष्ट्रावरचे देशावरचे संकट दूर होत नाही. हजार-पाचशे वारकरी रिंगण करतील तसेच मुस्लिम-बौध्द-ख्रिश्चन लोकांनी तसेच अठरापगड जातींनी आप-आपल्या परिने मानवंदना देऊन शिवशपथ घ्यायची आहे, असे सांगून आम्हाला भारतामध्ये स्वराज्य पाहिजे. समाजात जेव्हा डोळस वृत्ती येईल तेव्हा अंधश्रध्दा व धार्मिकतेची काठी सोडून दिली जाईल.रायगड आमचं विचारांचे धर्मक्षेत्र आहे. तिथे पवित्र भावना निर्माण होते,अशी भूमिका मांडली.
सदानंद येलवे यांनी, वारकरी संप्रदायाने बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचाराचे तर समाजाने संत स्वराज्य संविधानाचे विचार करावे असे आवाहन करून आपण संविधानाचे अनुयायी आहोत. मनूस्मृतीदहन महाडला तर स्वराज्य रायगडला आहे हे संविधानयात्रेचे वैशिष्ठय असल्याचे समाधान व्यक्त केले. घोगरे गुरुजी यांनी देखील चवदार तळे समतेचा संगर येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य पर्यंत संत विचारांसह पोहोचविण्यासाठी सर्वधर्मसमभावाने शिवछत्रपतींना अभिवादन करायला जमण्यासाठी आवाहन केले.

