(जैतापूर / राजन लाड)
ग्रुप ग्रामपंचायत साखर येथील उपसरपंचाकडून गावातील एका महिलेची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर परिसरातील महिलांनी अन्यायाविरुद्ध एकत्र येत 15 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शांततापूर्ण पण ठाम आंदोलनाची घोषणा केली आहे.
या आंदोलनातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे उपसरपंच आणि त्यांना साथ देणाऱ्या सहकाऱ्यांना महिलांकडून प्रतीकात्मक ‘बांगड्यांचा आहेर’ देण्यात येणार आहे. या महिलांच्या मते, जबाबदारी टाळणाऱ्या, अन्यायाकडे डोळेझाक करणाऱ्या लोकांना जागे करण्यासाठी हा बांगड्यांचा आहेर हा प्रतीकात्मक इशारा आहे.
या आंदोलनाबाबतचे निवेदन सरपंच आणि ग्रामसेवक यांना देण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची माहिती सागरी पोलीस ठाणे नाटे, गटविकास अधिकारी पंचायत समिती राजापूर आणि तहसीलदार राजापूर यांनाही पत्राद्वारे देण्यात आली आहे.
आंबेरकोणी येथील श्रीमती संगीता धुमाळ यांनी उपसरपंच श्री. रवींद्र राडये यांनी आपल्याला मदतीच्या नावाखाली सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेतल्याची तक्रार केली आहे. तंटामुक्त समिती तसेच पोलीस स्टेशनमध्येही त्यांनी हे मान्य केले असूनही चार वर्षांपासून रक्कम न परत केल्याने महिलांचा संताप वाढला आहे. सातत्याने समजावणी करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर महिलांनी न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनाचे परिणाम ग्रामपंचायतीच्या कारभारावर आणि स्थानिक प्रशासनावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांनी पीडित श्रीमती संगीता धुमाळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत स्पष्ट सांगितले आहे की, “अन्याय करणाऱ्यांना आणि त्याला साथ देणाऱ्यांना धडा हा मिळालाच पाहिजे!”
स्त्रियांच्या एकत्रित आवाजातून उभा राहिलेला हा विरोध ग्रामपंचायतीत आणि परिसरात खळबळ उडवणारा ठरत असून, त्या उपसरपंचाकडून राजीनामा घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असल्याचे समजते.

