( राजापूर )
राजकीय रणधुमाळीत महत्त्वाचा ‘मास्टर स्ट्रोक’ खेळत आमदार किरण सामंत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. “आमदार झालो त्या दिवशी मी राजापूर नगरपरिषदेत भगवा फडकवण्याची शपथ घेतली होती. ती शपथ येत्या २१ डिसेंबरला पूर्ण करणार आहे,” असे ते म्हणाले.
२३ नोव्हेंबर २०२४ रोजी घेतलेली ही शपथ जवळपास एका वर्षानंतर, २१ डिसेंबर २०२५ रोजी, राजापूरकरांच्या विश्वासाच्या जोरावर पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये लांजा नगरपंचायत आणि राजापूर नगरपरिषद या दोन्ही ठिकाणी महायुती एकहाती सत्ता मिळवेल, अशा चर्चांना स्थानिक राजकारणात चांगलाच ऊत आला आहे. शिवसेना महायुतीच्या अलीकडील संघटनात्मक हालचाली, वाढता जनसमर्थनाचा कल आणि सक्रिय प्रचारामुळे हा अंदाजाला अधिक बळ मिळत आहे.
स्थानिक पातळीवर महायुतीची पकड मजबूत झाली असल्याचे पदाधिकाऱ्यांचे मत असतानाच, विरोधक मात्र हे दावे फोल ठरवत आहेत. “जनतेचा कौल आम्हालाच मिळेल,” असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
आमदार सामंत यांनी लांजा-राजापूरच्या जनतेने केलेल्या मतदानाबद्दल आभार व्यक्त केले असून, त्यांच्या घोषणेमुळे राजापूरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुढील काही दिवसांत निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

