(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्याच्या सागरकिनारी वसलेल्या प्राचीन व सुप्रसिद्ध श्रीदेव रामेश्वर मंदिर, कुवेशी येथे आजपासून पारंपरिक कार्तिकोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक सोहळा आज शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर ते गुरुवार दि. ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे.
सकाळी श्रीदेव रामेश्वराची पूजन-विधी, देवाची आरती आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. संध्याकाळी धुपारतीनंतर रात्री किर्तन, आरती, पालखीभोवती प्रदक्षिणा आणि मध्यरात्री मंत्रपुष्पांजली तसेच दशावतारी संगीत या कार्यक्रमांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला.
विश्वस्त मंडळाच्या आयोजनाखाली संपूर्ण आठवडाभर पूजा, किर्तन, पालखी, दशावतारी प्रयोग आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. विशेष आकर्षण म्हणून सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह सोहळा आणि बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा दिनी बलीपूजन व नवस-गान्हाणी होणार आहेत.
उत्सवाचा समारोप गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी देवपूजा, दुपारी महाप्रसाद आणि रात्री लिंगायत मंडळींचा पारंपरिक दशावतार प्रयोग याने होणार आहे.
श्रीदेव रामेश्वर व श्री भरतदुर्गादेवी विश्वस्त मंडळ, कुवेशी यांच्या वतीने सर्व भाविकांना या उत्सवात सहभागी होऊन देवदर्शनाचा लाभ घ्यावा आणि श्रद्धेचा हा पारंपरिक सोहळा अधिक भव्यतेने साजरा करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
देणगी अथवा सहकार्य इच्छिणाऱ्या भक्तांसाठी मंदिराचे खाते पुढीलप्रमाणे —
बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा जैतापूर, खाते क्रमांक 60467204213, IFSC CODE: MAHB0001831, GPay: 9272043289
विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री. वैभव कुवेसकर (मो. ९२७०९७७०३६) यांनी आवाहन केले आहे की, “कार्तिकोत्सव हा श्रद्धा, संस्कार आणि एकतेचा उत्सव असून, आपण सर्वांनी भक्तिभावाने यात सहभागी व्हावे.”

