(चिपळूण)
रत्नागिरी जिल्ह्यात आज (गुरुवार) पहाटेपासून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई सुरू केली असून, खेड आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील प्रसिद्ध कात कारखान्यांवर ईडीच्या पथकाने अचानक धाड टाकली आहे. ही कारवाई नामवंत उद्योजक सचिन पाकळे यांच्या व्यवसायांवर करण्यात आल्याने, आणि त्यांचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि आमदार शेखर निकम यांच्याशी निकट संबंध असल्याने, कोकणातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आज सकाळी अंदाजे आठच्या सुमारास ईडीचे मोठे पथक सावर्डे आणि खेडमध्ये दाखल झाले. संपूर्ण कारवाई गुप्ततेत ठेवण्यात आली होती. पथकाने कारखान्यात प्रवेश करताच दरवाजे बंद करण्यात आले आणि कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, अकाउंटिंग रेकॉर्ड्स आणि इतर महत्त्वाच्या नोंदींची सखोल तपासणी सुरू झाली. परिसरात मोठ्या प्रमाणावर स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणालाही आत–बाहेर करण्यास कठोर मनाई करण्यात आली आहे.
सचिन पाकळे हे उद्योग आणि राजकारणातील प्रभावी नाव
रत्नागिरी–कोकणात कात उद्योगाचे मोठे नाव असलेले सचिन पाकळे हे दीर्घकाळ राजकीय वर्तुळातही सक्रिय मानले जातात. उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि शेखर निकम यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जात असल्याने, ईडीच्या धाडीला राजकीय परिणाम असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्यात ही कारवाई केवळ आर्थिक तपासापुरती मर्यादित नसून, “राजकीय संदेश” म्हणूनही चर्चिली जात आहे.
कारवाईचे कारण अद्याप अस्पष्ट
ईडीकडून ही धाड नेमकी मनी लॉन्ड्रिंग (PMLA) प्रकरणात आहे का किंवा इतर कोणत्या वित्तीय व्यवहारांबाबत आहे, याबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, अचानक झालेल्या मोठ्या कारवाईमुळे तर्क–वितर्क, राजकीय चर्चांचा भडका आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

