(पुणे)
कल्याणीनगर परिसरातील पोर्ट्शे कार अपघात प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवले होते. 19 मे 2024 रोजी 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत पोर्शे कारने दुचाकीस्वारांना धडक दिली, ज्यामुळे अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांच्या कर्तव्यपालनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, कारण आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले आणि या प्रकरणात पोलीस सहाय्यक ठरल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
आता या घटनेला जवळपास एक वर्ष पूर्ण होत असताना, राज्य सरकारने कठोर कारवाई केली आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यासोबतच, घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी म्हणून उपस्थित असलेल्या पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंद भोसले यांना पाच वर्ष पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
पोलिस तपासात उघड झाले की, घटनास्थळी पोहोचलेले काही पोलिस कर्मचाऱ्यांनी माहिती कंट्रोल रूमला न कळवल्याने अपघाताची माहिती रात्री ऑन ड्युटी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली नव्हती, ज्यामुळे गृहखात्याने कर्तव्यातील निष्काळजीपणाबाबत कठोर निर्णय घेतला आहे.
आरोपीची वयमर्यादा देखील या प्रकरणात मुद्दा ठरली होती. जेव्हा हा गुन्हा झाला तेव्हा आरोपीचे वय 17 वर्षे 8 महिने होते. प्रौढ होण्यासाठी त्याला फक्त चार महिने बाकी होते. पुणे पोलिसांनी आरोपीला प्रौढ म्हणून न्यायालयाकडे पाठवण्याची मागणी केली, मात्र बाल न्याय मंडळाने अवघ्या 14 तासांत 100 शब्दांचा निबंध लिहायला सांगून जमीन मंजूर केली होती. या निर्णयामुळे देशभरातून मोठा संताप व्यक्त झाला होता.
या कारवाईतून स्पष्ट होते की राज्य सरकार गंभीर अपघात प्रकरणांमध्ये पोलिस कर्तव्यपालनाची चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्यास कटिबद्ध आहे, तसेच नागरिकांसमोर न्यायाची योग्य प्रतिमा राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

