(रत्नागिरी / प्रतिनिधी)
एका बाजूला आई होण्याची गोड स्वप्ने; तर दुसऱ्या बाजूला प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतरच्या आवश्यक आरोग्यसेवेचा अभाव… याच संघर्षात जिल्ह्यातील निरागस बालजीवन कोमेजत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील तब्बल ८१६ चिमुकल्यांचा अकाली मृत्यू झाला असून, त्यातील सर्वाधिक मृत्यू नवजात बालकांचे असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार ० ते १ वर्षे वयोगटातील ७२९ बालके, तर १ ते ५ वर्षे वयोगटातील ८७ बालकांचा मृत्यू नोंदवला गेला. प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात योग्य निगा न राखणे, कुपोषण, वेळेवर आरोग्यसेवा न उपलब्ध होणे, तसेच लसीकरणातील ढिलाई ही या मृत्यूमागची प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट होत आहे. जन्मता मृत्यू दरात काही प्रमाणात घट दिसत असली तरी १ ते ५ वयोगटातील बालमृत्यू दरात होत असलेले चढउतार आरोग्य यंत्रणेपुढील अजूनही कठीण आव्हान अधोरेखित करतात.
ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिक दाहक आहे. अनेक मातांना गर्भावस्थेदरम्यान आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळत नाही. चुकीच्या जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव आणि आरोग्याविषयी अपुरी जागरूकता यामुळे माता व बालक दोघांचेही आरोग्य धोक्यात येते. काही ठिकाणी नवजात शिशु अतिदक्षता विभागांची कमतरता, बालरोग तज्ज्ञांची अनुपलब्धता आणि आर्थिक-सामाजिक अडचणींमुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. त्यातून मुलांची रोगप्रतिकारशक्ती ढासळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ही गंभीर परिस्थिती सुधारण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध स्तरांवर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांमार्फत गरोदर मातांची नोंदणी, नियमित तपासणी, प्रतिबंधात्मक लसीकरण आणि आवश्यक उपचारांवर विशेष भर दिला जात आहे. गर्भावस्थेत योग्य पोषक आहार, वैद्यकीय तपासण्या आणि प्रसुतीनंतर बालकाच्या आरोग्याची सातत्याने निगा राखणे अत्यावश्यक असल्याचेही आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
बालमृत्यूची ही संख्या केवळ आकडे नाहीत; तर असंख्य कुटुंबांच्या वेदना, अश्रू आणि अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची मन हेलावून टाकणारी नोंद आहे. मातृ व बालआरोग्याकडे गांभीर्याने पाहणे ही केवळ आरोग्य विभागाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी ठरते.जिल्ह्यातील या भीषण वास्तवाने मातृ व बालआरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीकरणाची तातडीची गरज अधोरेखित केली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये म्हणाले, “गरोदर मातांनी चिकित्सकांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासण्या, लसीकरण आणि पोषक आहाराचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रसुतीची चाहूल लागताच तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधल्यास आई आणि बाळ दोघांचेही आयुष्य सुरक्षित राहू शकते.”

