(गणपतीपुळे / वैभव पवार)
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी, भारतीय बौद्ध महासभा मीराताई प्रणित गट, भारतीय बौद्ध महासभा मोकळे गट तालुका रत्नागिरी या तिन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आयुष्यमान प्रकाश रामचंद्र पवार यांचे अध्यक्षतेखाली आणि तिन्ही संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोर असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पाच डिसेंबर रोजी रात्री ठीक बारा वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी समता सैन्य दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर तिन्ही धार्मिक संघटनांच्या उपस्थित बौद्धाचार्य यांचे उपस्थितीत त्रिशरण पंचशील व धार्मिक पूजापाठ घेण्यात आला.
उपस्थितांच्या वतीने बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून धम्म बंधू भगिनींनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्याप्रसंगी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेचे अध्यक्ष तथा संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, विजय मोहिते, सुहास कांबळे, तुषार जाधव, मंगेश सावंत, विजय आयरे, भगवान जाधव, शिवराज जाधव, विलास कांबळे, एम .बी. कांबळे, रमेश मोहिते, संजय आयरे आदी मान्यवर उपस्थित होते. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रत्नागिरी तालुक्यातील व शहरा नजीकच्या शाखांमधून अशोकनगर परटवणे,आंबेडकरवाडी, सडामिऱ्या, मिरजोळे, आंबेशेत व नेवरे आदी शाखांमधील धम्म बांधवांनी मशाल रॅलीने बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर बौद्धजन पंचायत समिती तोणदे शाखेतील तरुणांच्या वतीने उपस्थित धम्म बांधवांना मोफत चहाचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल संयुक्त जयंती समितीच्या वतीने तोणदे शाखेच्या तरुणांचे आभार व्यक्त करण्यात आले.
हा संपूर्ण कार्यक्रम 5 डिसेंबर रोजी रात्री 12 बारा वाजता सुरू करण्यात आला. त्यानंतर सहा डिसेंबर रोजी तिन्ही संघटना आणि रत्नागिरी तालुक्यातील तमाम आंबेडकरी अनुयायांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले .व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन संयुक्त जयंती उत्सव समितीच्या तिन्ही संघटनांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सचिव आयुष्यमान विजय मोहिते यांनी केले. हा संपूर्ण महापरिनिर्वाण दिन तिन्ही संघटनांच्या वतीने शांततेच्या वातावरणात साजरा करून बाबासाहेबांना अतिशय श्रद्धापूर्वक व मनोभावे अभिवादन करण्यात आले.