(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील आकाश लकेश्री यांनी हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉनसारख्या जगातील अत्यंत कठीण खेळस्पर्धेत दमदार कामगिरी सादर करत चिपळूणचे नाव राष्ट्रीय स्तरावर आणि जागतिक नकाशावर झळकावले आहे. एकूण आठ तास बावन्न मिनिटांत ही आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण करत त्यांनी येणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी अधिकृत पात्रता मिळवली आहे. देशातील केवळ मोजकेच खेळाडू या स्तरावरील स्पर्धेत उतरतात, त्यात आकाश यांनी साधलेले यश लक्षणीय ठरते.
हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन ही त्रि-कौशल्याची उच्चस्तरीय आणि अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा मानली जाते. पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तीन टप्प्यांमधून खेळाडूंची शारीरिक सामर्थ्याबरोबरच मानसिक जिद्दीचीही कसोटी लागते. थंडगार हवामान, हिमालयातील चढउतारांनी भरलेले रस्ते, कमी ऑक्सिजन आणि सततचा ताण या सर्वांवर मात करीत आकाश यांनी हा कठीण प्रवास यशस्वीरीत्या पार केला. या स्पर्धेतील त्यांच्या वेळांचा तपशील प्रभावी ठरतो. यामध्ये २.८ किमी पोहणे -१७-१८ अंश तापमानाच्या पाण्यात अवघ्या ५३ मिनिटांत, ८८ किमी सायकलिंग – २४०० मीटर चढाचा सामना करीत ४ तास २७ मिनिटांत, तर २१ किमी धावणे – १७०० मीटर चढासह ३ तास २१ मिनिटांत केला आहे.
आकाश लकेश्री हे मूळचे खेर्डीतील; सध्या ते पुण्यात राहतात. २०१८मध्ये स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे शिक्षण सुरू केले, मात्र आर्थिक अडचणींमुळे ते अर्धवट सोडावे लागले. याच काळात त्यांनी ट्रायथलॉनची वाट निवडत आयुष्याला नवे ध्येय दिले. पुण्यातील अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षणास सुरुवात केली. स्पोर्ट्स मॅनेजमेंट संस्थेत काम करताना सचिन तेंडुलकर आणि इतर आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सान्निध्यात राहून त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला. २०२०मध्ये दुबईतील पहिल्या मोठ्या स्पर्धेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास कोरोना काळात चिपळूणपर्यंत आला. २०२१मध्ये रत्नागिरीत त्यांनी कोचिंग सुरू केले आणि २०२४मध्ये ‘स्काय एंडुरन्स क्लब’ या नावाने स्वतःचे प्रशिक्षण केंद्रही उभे केले. आर्थिक पाठबळ नसतानाही जिद्दीच्या जोरावर नेपाळातील एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण करणारे ते भारताचे पहिले सहभागी ठरले.
हिमालयीन स्पर्धेसाठी आकाश यांनी लेह–लडाखमध्ये कठोर प्रशिक्षण घेतले. भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात काही दिवस ते लेहमध्येच अडकले, तरीही सरावाची शिस्त आणि धडाडी अबाधित ठेवत त्यांनी स्पर्धेची तयारी सुरू ठेवली. आजच्या यशाच्या पायाभरणीत अभिजीत यादव, सचिन खेर, संजय इथापे, विजय अनपट, शंतनु शितोळे आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी नमूद केले. आकाश लकेश्री यांच्या या कर्तृत्वामुळे चिपळूणचा क्रीडा लौकिक देशविदेशात अधिक उजळला आहे. येत्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

