(मुंबई)
राज्यात वाढत्या मानव-बिबट्या संघर्षामुळे चिंता वाढली असून, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. वन विभागाने मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा प्रस्ताव तयार केला असून, आता केवळ कॅबिनेट मंजुरीची प्रतीक्षा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून हा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
मानव-बिबट्या संघर्षात वाढ; ग्रामीण भागात भीतीचे सावट
मागील काही महिन्यांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत बिबट्या आणि वाघांच्या हल्ल्यांच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. या हल्ल्यांत अनेकांचा मृत्यू झाला आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीती आणि संताप वाढला असून, वन विभाग व सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी त्या त्या भागात आंदोलन करत बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर वन विभागाने काही नरभक्षक बिबट्यांना ठार करण्याची कारवाई केली आहे. मात्र पिंजऱ्यांची संख्या वाढवणे, गस्त वाढवणे अशा उपाययोजना करण्याची गरज आहे.
वन विभागाच्या या प्रस्तावावर विरोधकांनी समाधान व्यक्त केले असून, सरकारने तातडीने हा निर्णय अमलात आणावा, अशी मागणी केली आहे. बिबट्या हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, नोकरीचा निर्णय लवकर लागू करावा आणि जंगलातील अशा धोक्यांवर कायमस्वरूपी उपाय करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ठोस उपायांची गरज आहे. तज्ज्ञांच्या मते, जंगलातील अधिवास कमी होणे, अन्नसाखळीत बदल, गावांच्या सीमांवर वाढती मानवी वस्ती यामुळे बिबट्यांचे लोकवस्तीत वावर वाढल्याचे दिसून येते. पीडितांना नोकरी देण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी, बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी दीर्घकालीन, वैज्ञानिक आणि धोरणात्मक उपाययोजना आवश्यक आहेत, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
मानव-बिबट संघर्ष वाढत असताना बिबट्याबद्दल योग्य माहिती असणे अत्यंत महत्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते बिबट्या साधारणपणे मोठ्या आवाजाला, आकाराने मोठ्या दिसणाऱ्या वस्तूंना आणि संघर्षाला घाबरतो. तो शक्यतो माणसांना टाळतो; मात्र धोका वाटल्यास किंवा तो जखमी असल्यास हल्ला करू शकतो.
बिबट्या कशाला घाबरतो?
1. मोठा आवाज (Loud Sound) : मोठ्या आवाजामुळे बिबट्या गोंधळतो आणि पळून जातो.
उदा.: मोठ्याने बोलणे, शिट्टी वाजवणे, मोबाइलवर संगीत लावणे. बिबट्याला असे वाटते की त्याच्या परिसरात मोठा, सक्षम प्राणी आहे.
2. मोठा आकार (Large Appearance) ; बिबट्या आकाराने मोठ्या दिसणाऱ्या व्यक्तींवर हल्ला करण्याची शक्यता कमी असते. उभे रहा, वाकू नका किंवा बसू नका. दोन्ही हात वर करून स्वतः मोठे असल्याचे दाखवा.
3. धैर्य आणि आत्मविश्वास: घाबरून पळाल्यास बिबट्याला तुमच्यावर हल्ला करणे सोपे जाते. शांत राहा आणि आत्मविश्वास ठेवा. त्याच्याकडे तोंड करून हळू हळू मागे फिरा. बिबट्याकडे पाठ करून कधीही पळू नका. हळूवार मागे सरकत सुरक्षित अंतर ठेवा.
4. थेट संघर्षाची भीती : बिबट्या स्वतः जखमी होण्याचा धोका टाळतो, कारण तो जखमी झाला तर शिकार करू शकत नाही. त्यामुळे तो सहसा पळून जाणे पसंत करतो.
5. बिबट्याला राग आणू नका : त्याच्यावर दगड, काठी फेकू नका. त्याचा पाठलागही करू नका.
बिबट्याचा हल्ला का होतो?
बिबट्याचे हल्ले बहुतेक वेळा पुढील कारणांनी होतात:
- धोका वाटल्यास (विशेषतः पिलांजवळ गेल्यास)
- तो जखमी असल्यास
- अन्नाची कमतरता आणि पर्यावरणातील बदल
- मानवी वस्ती जंगलात शिरल्याने Habitat Conflict वाढणे
बिबट्या माणसांवर जाणीवपूर्वक हल्ला करत नाही. योग्य सावधगिरी, मोठा आवाज, शांत वृत्ती आणि योग्य अंतर ठेवले तर संघर्ष टाळता येतो.

