(डिजिटल डेस्क / नवी दिल्ली)
NEET-UG परीक्षेतील कथित अनियमितता, त्यानंतर झालेलं आंदोलन आणि गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी धडकताच जंतर-मंतरवर उपोषण आणि निदर्शने करणाऱ्या हजारो तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले.
त्यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपके यांनी, ‘या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत असं म्हटलं जात होतं. पण आम्ही करुन दाखवलं’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. जर तुम्ही घाबरलात नाही, या सरकारसमोर झुकलात नाही, तर कुणाचाही राजीनामा घेऊ शकता, याचाच हा पुरावा आहे. लोकशाहीत घाबरून राहायचं नसतं. राजीनामा देऊन झाला आहे, पण अजून मीटिंग होणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता देशभरात कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. ”
या राजीनाम्यानंतर सीजेपीनं एक्स प्लॅटफॉर्मवर आपल्या मागण्या पुन्हा लिहिल्या आहेत.
त्यात ते लिहितात, “सीजेपीच्या मागण्यांची यादी अद्ययावत करण्यात आली आहे:
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – ✅ पूर्ण
आत्महत्या केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत द्यावी – प्रलंबित
आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यावर कारवाई करू नये – प्रलंबित
आरएएफ (RAF) आणि दिल्ली पोलीसांनी जाहीरपणे माफी मागावी – प्रलंबित
जंतर-मंतरवरील आंदोलनकर्ते आणि देशभरातील लोक अजूनही या उर्वरित मागण्या पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत.”
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे केंद्र सरकारला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मात्र, सीजेपीने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण अद्यापही चांगलेच तापलेले आहे. जंतर-मंतरवरून पेटलेली आंदोलनाची ठिणगी आता देशभर पसरू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सीजेपीच्या उर्वरित मागण्यांबाबत तसेच आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात केंद्र सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

