(शिर्डी)
देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या शिर्डी साई मंदिरात साईबाबांच्या १०७ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने एका भाविकाने तब्बल १ कोटी रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण केला आहे. हा हार आंध्रप्रदेशातील एका भक्ताने अर्पण केला असून त्याचे वजन ९४५ ग्रॅम आहे, तसेच त्यावर नवरत्नांनी नक्षीकाम केलेले आहे. बाजारपेठेतील या हाराची किंमत १ कोटी २ लाख ७४ हजार ५८० रुपये इतकी आहे.

या हाराचे अर्पण संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साईबाबांच्या चरणी करण्यात आले. भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे. हा मौल्यवान हार पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिनी अर्पण करून भक्ताने साईबाबांच्या चरणी आपला श्रद्धाभाव व्यक्त केला.

