(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
कोकणात नवरात्रोत्सवाच्या पर्वाला आरंभ झाला असून संगमेश्वर परिसरातील विविध देवी – देवतांच्या मंदिरात रूपे लागून तसेच मंदिराची अंतर्बाह्य रोषणाई व आकर्षक सजावट करून सोमवारी उत्साहाला आरंभ झाला आहे. श्री निनावी देवी प्रासादिक मंडळाच्या वतीने संगमेश्वर मधील नावडी – भंडारवाडा येथील श्री. निनावी देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाचा मोठ्या उत्साहात आरंभ झाला आहे.
या नवसाला पावणाऱ्या श्री निनावी देवी मंदिरात ‘अखंड हरिनाम सप्ताह’ निमित्त सोमवार पहिल्या माळेला रात्री आरतीनंतर डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगणार आहे. सुप्रसिद्ध भजनकार बुवा – कु. सागर कणेरी, बाकाळे, ता. राजापूर (रत्नागिरी) व सुप्रसिद्ध भजनकार बुवा – श्री. व्यंकटेश नर, उंडिल ता. देवगड जि. सिंधुदुर्ग यांच्यामध्ये हा भजनाचा सामना रंगणार आहे. आज सोमवार गट अंब्रे बंधू यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक सज्जनांनी मातेच्या दर्शनाचा तसेच भजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवरात्र महोत्सव डबलबारी भजनाची मेजवानी लाभणार आहे. श्री निनावी देवी प्रासादिक मंडळ यांस कडून मंडळाचे अध्यक्ष व मानकरी श्री. दत्ताराम किसन उर्फ बावा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र महोत्सवात भजने, डबलबारी भजने, ज्ञानदेव हरिपाठ तसेच महिलांची भजने इत्यादी विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

