( नवी दिल्ली )
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने एच-1बी व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ जाहीर करताच विदेशात गेलेल्या हजारो भारतीयांसमोर संकट उभं राहिलं आहे. नव्या निर्णयानुसार व्हिसा शुल्क थेट ८८ लाख रुपये (सुमारे १ लाख डॉलर्स) इतकं करण्यात आलं असून, त्याचा त्वरित अंमलबजावणीचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे.
कंपन्यांचा तातडीचा आदेश, कर्मचारी गोंधळले
या घोषणेनंतर काही तासांतच Amazon, Microsoft यांसारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांनी आपले कर्मचारी तातडीने अमेरिकेत परत यावेत, असे आदेश जारी केले. परिणामी, अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियोजित सुट्ट्या रद्द करून जवळच्या विमानतळावर धाव घ्यावी लागली. यामुळे काही जणांचे लग्न समारंभ थांबले, तर काहींनी कौटुंबिक कार्यक्रम आणि अनेक महिन्यांपासून आखलेल्या भेटी गमावल्या.
“आईला भेटायचं होतं, पण…”
‘सरमुच’ नावाच्या रेडिट युजरने त्याचा अनुभव शेअर करत लिहिलं, “माझी आई मला अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदा भेटणार होती. आम्ही एक आठवडा एकत्र घालवण्याचं ठरवलं होतं. पण शनिवारीच Amazon आणि Microsoft कडून ईमेल आला — २१ सप्टेंबर सकाळी ९.३१ पूर्वी अमेरिकेत परत या. त्यामुळे सर्व नियोजन कोलमडलं. आईची भेट, वेळ आणि कुटुंब सगळंच गमावलं.”
एका तरूणीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत एच-१बी व्हिसा आणि तिच्या वैयक्तिक सुट्टीची उडालेली दाणादाण याबद्दल व्यथा मांडली. ट्रम्प यांनी व्हिसावर शुल्क वाढवल्यानंतर तिचा प्रियकर रोममध्ये प्रेयसीला एकटी सोडून निघून गेला. या व्हिडीओमध्ये प्रेयसीने म्हटले की, तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल. पण माझा प्रियकर मला इथे टाकून गेला. आम्ही रोममध्ये इटालियन पास्ता बनविणे शिकत होतो. क्लासरूममध्ये असताना त्याला व्हिसाचे शुल्क वाढविल्याची बातमी कळली. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत अमेरिकेत न परतल्यास १ लाख डॉलर्स द्यावे लागणार होते. त्यामुळे शनिवारी अर्ध्या रात्री मला टाकून तो निघून गेला.
अचानक नियम बदल, प्रवास रद्द
शुक्रवारी उशिरा झालेल्या या निर्णयामुळे अनेक एच-1बी व्हिसाधारकांमध्ये गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही जणांना विमानतळावर पोहोचल्यावरच नवीन नियमांची माहिती मिळाली, ज्यामुळे प्रवास रद्द करावा लागला. काहींनी तर पुढील सूचना येईपर्यंत अमेरिकेबाहेर न जाण्याचा निर्णय घेतला.
यानंतर व्हाईट हाऊसकडून स्पष्टता देण्यात आली की, अमेरिकेत परतणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सध्या वाढीव शुल्क आकारलं जाणार नाही. मात्र तरीही, जी अनिश्चितता आणि गोंधळ निर्माण झाला होता, त्याचा परिणाम अनेकांच्या मानसिकतेवर झाला.
“नियम काय आहेत, कुणालाही माहिती नाही”
या नव्या नियमामुळे तयार झालेली स्थिती ही प्रवासबंदीप्रमाणेच असल्याचं एक एच-1बी धारक म्हणाला. “जरी पासपोर्टवर वैध व्हिसा असला, तरी जर १ लाख डॉलर्सचा पुरावा दाखवला नाही, तर अमेरिकेत प्रवेश मिळत नाही. पण ही प्रक्रिया काय आहे? किती काळ चालणार? याविषयी कुठलीही स्पष्टता नाही. ही पूर्ण अराजकता आहे.”
या निर्णयामुळे केवळ कामगारच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांचंही मानसिक खच्चीकरण झालं आहे. अनेकांनी स्पष्ट केलं की, “व्हिसा हे फक्त एक सरकारी कागद आहे, पण त्यामागे माणसांची भावनिक गुंतवणूक, कुटुंब आणि आयुष्य असतं. ट्रम्प सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिकच नव्हे, तर सामाजिक आणि भावनिकदृष्ट्याही ताण निर्माण झाला आहे.”
एच-1बी व्हिसा शुल्कात अचानक करण्यात आलेल्या वाढीमुळे हजारो भारतीयांना तातडीने अमेरिकेत परतावं लागलं. कौटुंबिक कार्यक्रम रद्द, आर्थिक खर्च, आणि मानसिक ताण यामुळे अनेकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. नियमांची स्पष्टता नसल्यामुळे असुरक्षितता वाढली असून, सरकारच्या निर्णयावर तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

