(कोल्हापूर)
इचलकरंजीतील सुहास थोरात या 19 वर्षीय तरुणाचं अपहरण करून कर्नाटक सीमेवर निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस येताच संपूर्ण शहर हादरलं. सुरुवातीला जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचं पोलिस तपासातून समोर आलं होतं. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक वळण आलं असून, सुहासचे मेहुणीशी असलेल्या प्रेमसंबंधांवरून त्याची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कसं घडले अपहरण आणि खून?
भोनेमाळ परिसरातील सुहास थोरात हा तरुण वाहन शोरूममध्ये काम करत होता. शुक्रवारी दुपारी जेवणासाठी घरी आल्यानंतर आरोपींनी दुचाकी दुरुस्तीच्या कारणाखाली त्याला सोबत नेलं. त्यानंतर लिगाडे मळा येथून सुहासला थेट कर्नाटकातील निपाणी – देवचंद कॉलेजमागील ओढ्याकडे नेण्यात आलं. तेथे कोयत्याने डोके, हात, तोंडावर सात-आठ वार करून त्याची निर्घुण हत्या केली आणि मृतदेह जवळच्या ओढ्यात फेकला. संध्याकाळपर्यंत मुलगा घरी आला नाही म्हणून वडिलांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार केली. दुसऱ्या दिवशी मुरगूड पोलिसांना ओढ्यात सुहासचा मृतदेह आढळला.
आरोपी ताब्यात; चौकशीत उघड झाले नवे खुलासे
शिवाजीनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चंदूर रोडवरील शाहूनगर परिसरातून आरोपींना पकडलं. ताब्यात घेतलेले आरोपी ओंकार अमर शिंदे (25), ओंकार रमेश कुंभार (23) एक अल्पवयीन साथीदार आहे. दोन्ही प्रौढ आरोपींना 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.
खूनाचा खरा कारण प्रेमसंबंध?
प्राथमिक तपासात वर्षभरापूर्वी सुहास आणि ओंकार शिंदे यांच्यात वाद झाला असल्याचे समोर आले आहे. जेव्हा शिंदेने सुहासला चाकू लावून धमकी दिली होती. मात्र आता तपासात सुहासची मेहुणीशी प्रेमसंबंध असल्याचा राग हा वैमनस्याचा मूळ कारण असल्याचा धागा पोलिसांना मिळाला आहे. शिवाजीनगर पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड म्हणाले, “सुहास आणि प्रमुख आरोपी ओंकार शिंदे यांच्यात वर्षभरापूर्वीही वाद झाला होता. मात्र प्राथमिक तपासानुसार, ओंकार शिंदे याच्या मेहुणीशी सुहासचे सुरू असलेले प्रेमसंबंध हेच खूनाचं मूळ कारण असल्याची प्राथमिक माहिती तपासातून मिळत आहे.”
आरोपी ओंकार शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यानं सोशल मीडियावर ठेवलेल्या “सूरज ढलता है, डुबता नहीं” या स्टेटसमुळं पोलिसांचा संशय त्याच्यावर गेला. तपासात सीसीटीव्ही फुटेज. मोबाईल लोकेशन. शस्त्र जप्ती, घटनास्थळाचा पंचनामा वापरलेले महत्त्वाचे पुरावे मिळाले. या गुन्ह्यात पोलिसांनी अपहरण, खून व इतर गंभीर कलमं लावली आहेत.
या घटनेनंतर शहरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. नातेवाईक आणि नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर जमाव जमवत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तर सुहासच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, तपास जलदगतीनं होऊन न्याय मिळावा अशी त्यांनी जोरदार मागणी केली आहे.

