(राजापूर)
पाचल ते ताम्हाणे जाणाऱ्या रस्त्यावर तळवडे धनगरवाडी एस.टी. स्टॉपजवळ एका वळणावर निष्काळजीपणे वाहन चालविल्याने एस.टी. बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. या प्रकरणी डंपर चालक लक्ष्मण सुरेश मालोंडकर (वय ३२, रा. मालोड, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) यांनी तक्रार दाखल केली असून, आरोपी एस.टी. बस चालक खंडाप्पा शिवाजी मनशेट्टी (वय ३५, रा. चिवरी, ता. तुळजापूर, जि. धाराशीव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.५० च्या सुमारास फिर्यादी मालोंडकर हे त्यांच्या ताब्यातील आयशर डंपर (क्र. MH-06 BD-1062) चालवत पाचल ते ताम्हाणे रस्त्याने जात असताना ही घटना घडली. तळवडे धनगरवाडी एस.टी. स्टॉपजवळील वळणावर फिर्यादी जात असताना, आरोपीने आपली ताब्यातील एस.टी. बस (क्र. MH-14 BT-1489) उतारावर निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवली. वळणावर योग्य ती खबरदारी न घेतल्याने बस थेट राँग साईडने येत डंपरच्या पुढच्या बाजूस जोरदार धडकली.
या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र, फिर्यादीच्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७६/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत आरोपी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.