(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणाची प्रतिभावान कन्या आर्किटेक्ट शर्वरी रमेश पावसकर हिला वास्तुकला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय पातळीवरील बहुमान प्राप्त झाला आहे. गोवा येथे पार पडलेल्या ‘Design & Vision D&V’25 Built Environment Leadership Awards’ या प्रतिष्ठित सोहळ्यात शर्वरी यांना ‘Trusted & Innovative Architect & Designer of the Year 2025 – Maharashtra’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशातील तब्बल २८ राज्यांमधील निवडक उमेदवारांमधून झालेल्या कसून छाननीनंतर शर्वरीची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातून मिळालेला हा सन्मान रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. वास्तुरचनाक्षेत्रातील शर्वरी यांची नवोन्मेषी कल्पनाशक्ती, सर्जनशील दृष्टिकोन, गुणवत्तापूर्ण कामकाजाची बांधिलकी आणि सातत्यपूर्ण परिश्रम याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे, हा सन्मान दोन नॅशनल अवॉर्ड-विजेते, पद्मश्री आर्किटेक्ट जी. शंकर यांच्या हस्ते प्रदान झाला, ही तिच्यासाठी अतिरिक्त अभिमानाची बाब ठरली.
शर्वरी पावसकरच्या या यशाबद्दल रत्नागिरीत आनंद व्यक्त केला जात असून तिच्या पुढील वाटचालीसाठी उज्ज्वल यश आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत. रत्नागिरीच्या या कन्येने भविष्यातही अनेक यशाची शिखरे सर करावीत, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.

