( संगमेश्वर / प्रतिनिधी )
प्राचीन रामक्षेत्रातील ऐतिहासिक प्राचीन वारसा असलेले समृद्ध भारतीय स्थापत्य वैभव अशा कसबा (संगमेश्वर) येथील श्री कर्णेश्वर मंदिर प्रांगणात शुक्रवार – शनिवार – रविवार दि. १२, १३ आणि १४ डिसेंबर रोजी श्री कर्णेश्वर कला-संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने आणि श्री कर्णेश्वर देवस्थान व कलांगण संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. याआधी या महोत्सवात सोनिया परचुरे, चारुदत्तबुवा आफळे, पं. विश्वनाथ कान्हेरे, आदित्य ओक, ओंकार प्रभुघाटे अशा अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली आहे.
यावर्षी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नृत्यगुरु सौ. श्रुती आठल्ये (कथ्थक) आणि सौ. प्रणाली तोडणकर (भरतनाट्यम) यांसह त्यांचे सहकारी यांचे कथ्थक आणि भरतनाट्यम या दोन नृत्य शैलींच एकत्रित दर्शन पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, दि. १२ डिसेंबर रोजी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. शनिवार, दि. १३ डिसेंबर – दुसऱ्या दिवशी नुकत्याच झालेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या पखवाज अलंकार परीक्षेत देशभरात प्रथम क्रमांक प्राप्त सुप्रसिद्ध पखवाज वादक प्रथमेश तारळकर यांची पखवाज एकल वादन मैफल आयोजित केली आहे. मंदार दीक्षित (संवादिनी), विशारद गुरव (गायन), रोहित धुरी व अमित कामतेकर (पखवाज) यांची साथ त्यांना मैफलीत लाभणार आहे.
तिसऱ्या दिवशी रविवार, दि. १४ डिसेंबर रोजी महोत्सवाचा कळस जेष्ठ गायक स्व. जितेंद्र अभिषेकी यांचे नातू आणि प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांचे चिरंजीव अभेद शौनक अभिषेकी यांच्या गायन मैफलीने चढवला जाईल. प्रशांत पांडव (तबला), वरद सोहनी (संवादिनी) आणि प्रथमेश तारळकर (पखवाज) यांच्या साथीने मैफलीची आणि महोत्सवाची सांगता होईल. तिन्ही दिवशी रात्री ९:०० वाजता कार्यक्रमास प्रारंभ होईल.
या महोत्सवात नृत्य, वादन, गायन यासोबत महोत्सवाच्या तिन्ही दिवशी मंदिराच्या प्रांगणात सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे आणि डी कॅड कॉलेज, देवरुख मधील विद्यार्थ्यांचे चित्र, शिल्प कला प्रदर्शन आयोजित केले आहे. मंदिराभोवती लावलेल्या हेरिटेज लाइट्स मुळे मंदिराच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. रात्रीच्या वेळी मंदिराचे दृश्य विलोभनीय असते. संपूर्ण महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कर्णेश्वर महोत्सवास उपस्थित रहावे असे आवाहन श्री कर्णेश्वर देवस्थान आणि कलांगण-संगमेश्वर यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे
महोत्सवात कर्णेश्वरी साडीचे सादरीकरण
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी धनंजय प्रभुघाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कर्णेश्वरी साडीचे सादरीकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे, डॉ. आसावरी संसारे (उपजिल्हाधिकारी – पुनर्वसन), सौ. अमृता साबळे (तहसीलदार – संगमेश्वर) आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री, निवेदिका सौ. संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांच्या शुभहस्ते होणार आहे. या साडीचे वैशिष्ठ्य म्हणजे याच्या दोन्ही काठांची नक्षी. कर्णेश्वर मंदिरावरील निवडक नक्षी या साडीसाठी निवडली गेली आहेत. कोकणात पूर्ण सुती कपडे जास्त योग्य ठरतात म्हणून ही साडी सेंद्रिय कापसाच्या सुती धाग्यांनी विणलेली आहे. एक साडी विणायला किमान ५ तास लागतात.

