(चिपळूण)
तालुक्यातील पिंपळी येथे स्मशानभूमीत एक धक्कादायक प्रकार घडला. अंत्यदर्शनासाठी अवघे काही मिनिटे थांबावे, अशी केलेली साधी विनंती चार जणांच्या आक्रमकतेचे कारण ठरली. यामध्ये प्रशांत पोपट चव्हाण (३३, रा. आकले, चिपळूण) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली.
प्रशांत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ते त्यांच्या सख्ख्या मामी कविता बाळू जाधव यांच्या अंत्यविधीसाठी पिंपळी खुर्द स्मशानभूमीत गेले होते. त्यावेळी त्यांच्या इतर नातेवाईकांची उपस्थिती होती. “आई-वडील आणि इतर जिवलग काही अंतरावर असून, ते अंत्यदर्शनासाठी येत आहेत; कृपया थोडा वेळ थांबा,” अशी त्यांनी विनंती केली. मात्र काही नातेवाईकांनी अंत्यसंस्कार तातडीने पार पाडावेत, असा आग्रह धरला.
या भांडणाची अखेर वादात, आणि नंतर मारहाणीत रुपांतर झाले. किरण बाळू जाधव व मगट व्यंकट जाधव यांनी प्रशांत यांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर किरण जाधव याने तेथेच पडलेला दगड उचलून प्रशांत यांच्या डोक्यात मारला. एवढ्यावरच न थांबता मगट जाधव, अविनाश मगट जाधव आणि सौरभ सुनील जाधव यांनीही एकत्रित मारहाण केली, तसेच शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. “तुला सोडणार नाही,” अशी धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी किरण बाळू जाधव, मगट व्यंकट जाधव, अविनाश मगट जाधव आणि सौरभ सुनील जाधव या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

