(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील आदर्श जीवन शिक्षण शाळा क्रमांक १, जी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत इ.स. १८५१ साली स्थापन झाली, तसेच महाराष्ट्रातील प्राचीन शाळांपैकी एक मानली जाते, ती यंदा आपल्या १७५व्या वर्षात पदार्पण करत आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून ५ ऑगस्ट २०२५ पासून या शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाला भव्य प्रारंभ होणार असून या शतकोत्तर अमृत महोत्सवाचा शुभारंभ उद्या शनिवार दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भव्य दिव्य स्वरूपात आणि मोठ्या थाटामाटात उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
या महोत्सवाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती आणि शतकोत्तर अमृत महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. महोत्सवानिमित्त शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण विषयक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळा परिसरात मोठ्या जय्यत तयारीचे चित्र दिसून येत असून, या तयारीत समित्यांचे पदाधिकारी, सदस्य, पालक, आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले आहेत. माजी विद्यार्थ्यांचा सहभाग हा या महोत्सवाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे. १९६० पासूनचे तसेच अलीकडच्या काळातील माजी विद्यार्थी एकत्र येत असून नियोजनात सक्रिय भूमिका निभावत आहेत. यावेळी शाळेच्या जागेत बहुउपयोगी सभागृह उभारण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच शासकीय पातळीवरून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महोत्सवाच्या कालावधीत वृक्षारोपण, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, रांगोळी, संविधान पाठांतर, समूहगीत, देशभक्तीपर गीत गायन व क्रीडा स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन होणार आहे. यात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होणार आहेत.
उद्घाटन सोहळ्याला आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती व शतकोत्तर अमृत महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.