(ठाणे)
ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या अचानक घटल्याने नागरिक व प्राणीप्रेमींमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान, शहरात अवैध अवयव प्रत्यारोपण करणारी टोळी सक्रिय असून काही खासगी पेट क्लिनिकमध्ये बेवारस प्राण्यांचे अवयव काढून प्रत्यारोपण करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती प्राणीप्रेमींनी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांना दिली आहे.
गत काही महिन्यांपासून ही टोळी सक्रिय असल्याचे सांगत नागरिकांनी ठाण्यातील भटके श्वान अचानक गायब होत असल्याची तक्रार मांडली आहे. या गंभीर प्रकारामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.
तक्रारींची दखल घेत खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना त्वरित चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी आरोग्य विभागाकडून निर्बीजीकरणासाठी नेण्यात येणाऱ्या भटक्या कुत्र्यांना पुन्हा त्यांच्या परिसरात सोडले जात नाही, यावरही गंभीर प्रश्न उपस्थित केला. हे अवैध अवयव प्रत्यारोपण रोखण्यासाठी प्रशासनाने काटेकोर तपास करून आवश्यक ती उपाययोजना करावी असे आदेश नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.
काही खासगी प्राणी रुग्णालयांवर संशय
नागरिकांच्या माहितीनुसार, काही खासगी प्राणी रुग्णालयांमध्ये पाळीव कुत्र्यांवर अवैधरित्या अवयव प्रत्यारोपण केले जात असून त्यासाठी बेवारस श्वानांचे अवयव जबरदस्तीने काढले जात आहेत. पैसे कमावण्यासाठी या टोळीने शहरातील रस्त्यावरील प्राण्यांना लक्ष्य केले आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
तीन हात नाका परिसरात काही जण भटके श्वान घेऊन जात असल्याचे पाहून नागरिकांनी त्यांना थांबवले आणि ओळखपत्र मागितले. मात्र, त्यांनी कोणतीही माहिती न देता पळ काढला. या घटनेची लेखी तक्रार ठाणे पोलिसांकडे दाखल झाली असली तरी पुरावे नसल्याने तत्काळ कारवाई शक्य झाली नाही.
“नागरिकांनी ठोस माहिती आणि पुरावे दिल्यास आरोपींवर थेट कारवाई करता येईल. संशयास्पद हालचाल दिसताच त्वरित पोलिसांना कळवा,” असे ठाणे पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागासमोरच स्वतःच्या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने, भटके आणि बेवारस प्राण्यांवर लक्ष ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. या परिस्थितीत प्राणी कल्याण आणि अवैध प्रकार रोखण्याची जबाबदारी कशी पार पाडायची, असा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

