(राजापूर / तुषार पाचलकर)
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील रिंगणे गावची विद्यार्थिनी कुमारी मानसी संजय हांदे हिने राष्ट्रीय स्तरावरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तिच्या या भव्य यशामुळे राज्याचा आणि जिल्ह्याचा मान उंचावला असून क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे मानसीचा यथोचित सत्कार आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता, राजापूर तालुक्यातील सरस्वती विद्या मंदिर, पाचल – वाडिया हॉल येथे होणार आहे.
पाचल परिसरातील सर्व क्रीडाप्रेमी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी मानसीला शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. मानसीचा आदर्श घेऊन परिसरातील तरुणांनीही क्रीडा क्षेत्रात पुढे यावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला आहे.

