(राजापूर / वार्ताहर)
पडवणे वाडी गावातील सार्वजनिक मार्गांची स्वच्छता, सुरक्षितता आणि देखभाल राखण्यासाठी पडवणे वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. ग्रामस्थांच्या एकजुटीतून राबविण्यात आलेल्या या स्वच्छता उपक्रमात गावातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांची साफसफाई करण्यात आली. या उपक्रमामुळे सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यासोबतच गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याचा आदर्श निर्माण केला.
श्रमदानादरम्यान एस.टी. बस मार्गाची साफसफाई करण्यात आली. तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील वाढलेले गवत, झाडे-झुडपे आणि इतर अडथळे हटविण्यात आले. याशिवाय वीज वाहिन्यांच्या मार्गात आलेली झाडे-झुडपे काढून परिसर सुरक्षित करण्यात आला. सार्वजनिक विहिरीकडे जाणाऱ्या मार्गाचीही स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना तसेच गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांना या मार्गांचा सुरक्षित आणि सुलभ वापर करता येणार आहे.
या श्रमदान उपक्रमात मंगेश पारकर, नितेज आंबोळकर, महेश आंबोळकर, रोहित आंबोळकर, विवेक आंबोळकर, प्रणित आंबोळकर, यश आंबोळकर, प्रशांत नार्वेकर, राजेंद्र मेळेकर, हेमनाथ आंबोळकर, दिव्यम आंबोळकर, त्रिशल आंबोळकर, उदय आंबोळकर, निलेश आंबोळकर, प्रकाश आंबोळकर, मारुती आंबोळकर, सुगंध ठाकरे, चंद्रकांत आंबोळकर, विनोद नार्वेकर आणि दिवाकर आंबोळकर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
श्रमदानासाठी सकाळपासून उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या नाश्ता व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मनीषा चेऊलकर, अशोक पांडुरंग पारकर, राजेश वाडेकर, विनायक मेळेकर, शोहन आंबोळकर, पराग नार्वेकर आणि उदय आंबोळकर यांनी सहकार्य केले. श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल पडवणे वाडीतील ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केवळ प्रशासनाची जबाबदारी न मानता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या छोट्या-छोट्या कामांमध्येही ग्रामस्थांनी एकजुटीने सहभाग घेतल्यास गावाचा परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर ठेवता येऊ शकतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. “आपले गाव, आपली जबाबदारी” या भावनेतून पडवणे वाडीतील ग्रामस्थांनी केलेले हे श्रमदान सामाजिक बांधिलकीचे आणि ग्रामएकतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

