(रत्नागिरी)
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा रत्नागिरी यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या कोकणातील नाट्य उत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली.
या वेळी बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले, “देशातील सर्वात प्रदीर्घ नाट्यस्पर्धा कोणती असेल, तर ती नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती नाट्यस्पर्धा होय. तब्बल १८२ दिवस ही स्पर्धा सुरु होती — वर्ल्डकप किंवा आयपीएल सुद्धा एवढे चालत नाहीत! रत्नागिरीकरांचा नाटकावरील प्रेम आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन यामुळे रंगभूमीच्या इतिहासात हा एक वेगळा विक्रम प्रस्थापित झाला आहे.”
या स्पर्धेमुळे अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळाले असून, ते पुढे जाऊन महाराष्ट्राच्या रंगभूमीकडे वाटचाल करत आहेत. नाट्य परिषदेचे हे कलाकार घडवण्याचे कार्य अत्यंत तळमळीने सुरू असून, यासाठी संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन करावेसे वाटते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी एक महत्त्वपूर्ण सूचना करत पालकमंत्री सामंत म्हणाले, “प्रत्येक नाटकाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग अनिवार्य करावे. यामुळे निवडक नाटके विविध टेलिव्हिजन चॅनेल्सवर दाखवता येतील आणि स्थानिक संस्थांना अधिक व्यापक व्यासपीठ मिळेल.”
समारंभात विविध विभागांतील विजेत्या नाट्यसंस्थांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला स्थानिक कलावंत, रसिक प्रेक्षक, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

