(रत्नागिरी)
ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय दाखले, प्रमाणपत्रे आणि विविध शासकीय सेवांसाठी वारंवार तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ प्रभावीपणे राबविले आहे. या अभियानामुळे ग्रामीण जनतेचा वेळ आणि पैशांची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून, गावपातळीवरच अनेक शासकीय कामे मार्गी लागतील, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, प्रांताधिकारी जीवन देसाई, सभापती प्रवीण पांचाळ, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, दादा दळी, बंटी वणजू आदी मान्यवर उपस्थित होते.
तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याचा संकल्प
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेला प्रशासनाच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात राबविण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून लाखो प्रलंबित कामे मार्गी लागली होती. त्याच धर्तीवर आता ‘महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ वर्षभर प्रभावीपणे राबवून शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सकारात्मक संवाद साधावा, एखादे काम नियमांमुळे शक्य नसल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, हीदेखील प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटन जिल्ह्यासाठी स्वच्छतेवर भर
रत्नागिरी हा राज्यातील महत्त्वाचा पर्यटन जिल्हा असून येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे समुद्रकिनारे आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची सामूहिक जबाबदारी असल्याचे डॉ. सामंत यांनी सांगितले. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिकेचे प्रकाशन
कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ‘आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिका’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
मान्सूनसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी इयत्ता आठवी ते बारावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण देण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
अधिकाऱ्यांशी थेट संपर्कासाठी ५०० मोबाईल फोन
शासकीय कार्यालयांमध्ये केवळ लँडलाईनवर अवलंबून न राहता नागरिकांना अधिकाऱ्यांशी सहज संपर्क साधता यावा, यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ५०० मोबाईल फोन विविध कार्यालयांना उपलब्ध करून देण्याची संकल्पना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी मांडली.
पहिल्याच टप्प्यात १ लाख नागरिकांपर्यंत पोहोचलो : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले की, महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या पहिल्याच टप्प्यात प्रशासनाने तब्बल एक लाख नागरिकांपर्यंत पोहोचून विविध शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. शासनाच्या योजनांपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण
या शिबिरात अनेक शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना थेट देण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने, नवीन शिधापत्रिकांचे वितरण, आयुष्मान भारत आणि आभा (ABHA) कार्ड वाटप, संजय गांधी निराधार योजनेचे लाभ व उत्पन्न दाखले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मंजुरीपत्रांचे वितरण, गरोदर मातांना बेबी केअर किट, ‘उमेद’ अभियानांतर्गत महिला बचत गटांना कर्ज मंजुरीपत्रे
यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तसेच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले, तर आभार तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मानले. सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले.

