(रत्नागिरी)
शहरानजीकच्या नाचणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (MJP) गोडाऊनला रविवारी सकाळी लागलेली आग ही केवळ अपघाती घटना नसून, परिसरातील स्वच्छता व्यवस्थेकडे झालेल्या दुर्लक्षाचे गंभीर परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे. हवामान केंद्रासमोरील मोकळ्या जागेत महिनोन्महिने साचलेल्या सुक्या गवताच्या ढिगाऱ्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ही भीषण आग पेटल्याची प्राथमिक माहिती आहे.
सुक्या गवताने पेटली आग, क्षणात गोडाऊनला वेढले ज्वाळांनी
रविवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी मोकळ्या मैदानातील सुक्या गवताला अचानक आग लागली. वाऱ्याच्या भरात ही आग झपाट्याने पसरत MJP गोडाऊनपर्यंत पोहोचली. तेथे साठवून ठेवलेले पाणीपुरवठा योजनांसाठीचे एचडीपी पाईप्स अत्यंत ज्वलनशील असल्याने क्षणार्धात पेट घेत ज्वाळांनी प्रचंड रूप धारण केले. धुराचे लोट आकाशात झोकावताच नागरिकांनी तत्काळ नगरपरिषद आणि एमआयडीसी अग्निशमन दलाला माहिती दिली.
अग्निशमन दलाची शर्थीचे प्रयत्न; तासाभराने आग नियंत्रणात
नगरपरिषद व एमआयडीसीच्या संयुक्त पथकांनी तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. अन्यथा संपूर्ण गोडाऊन राखच झाले असते, असा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. अधिकृत नोंदीनुसार नुकसान ९ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष जळालेल्या साहित्याचे प्रमाण पाहता वास्तविक नुकसान यापेक्षा अधिक असल्याचा नागरिकांचा दावा आहे.
आग अपघाती की हेतुपुरस्सर?
परिसरातील कायमची अस्वच्छता, साचलेले गवत, रखडलेल्या स्वच्छता मोहिमा आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष यामुळे ही आग नैसर्गिक की हेतुपुरस्सर लावण्यात आली, असा प्रश्न स्थानिक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी अपघाती आग म्हणून नोंद केली असली तरी संशयाची कुजबूज सुरू होती.
महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरितच
- स्वच्छता मोहिमांमध्ये हा परिसर वारंवार दुर्लक्षित का राहतो?
- हवामान केंद्राजवळील संवेदनशील जागेत सुक्या गवताचे ढिगारे साचू कसे दिले?
- MJP गोडाऊनच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर?
ही आग प्रशासनासाठी गंभीर इशारा आहे. स्वच्छता व सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष सुरूच राहिल्यास अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

