( चिपळूण )
महामार्गावर असुर्डे येथे विनापास खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर वन विभागाने कारवाई केली आहे. वनपाल अधिकारी रेशमा कावळे व जाधव यांच्या पथकाने रविवारी सकाळी सुमारे ९.३० वाजता झेनॉन वाहनातून होत असलेली ही बेकायदेशीर वाहतूक अडवली.
कारवाईनंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर झेनॉन वाहन ताब्यात घेऊन ते असुर्डे येथील पटेल मिल परिसरात जमा केले. वाहनाची चावी जप्त करून महिला कर्मचारी पुढील कार्यवाहीसाठी घटनास्थळावरून निघून गेल्या. दरम्यान, वाहन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
तन्मय मंगेश सुर्वे (साखरपा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे ८० मण खैर लाकूड दहीवली येथील कात भट्टीवर नेले जात होते. लाकूड काढण्याचा आणि वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वन विभागाच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर लाकूड तस्करीला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे स्थानिक स्तरावर सांगितले जात आहे.

